Israel Attack Iran : इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

  • तेहरान आणि इस्फहान शहरांतील अण्वस्त्र केंद्रांना केले लक्ष्य !

  • इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे केली निकामी !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने १९ एप्रिलला पहाटे इराणवर प्रत्युत्तरादाखल तेहरान आणि इस्फहान या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. इस्रायलच्या आक्रमणानंतर इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा सक्रीय झाली आणि तिने इस्रायलची क्षेपणास्त्र निष्क्रीय केली. त्यामुळे इराणची हानी झाली नाही. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र उत्पादनांच्या ठिकाणांना लक्ष्य करत हे आक्रमण केले होते. इराणचे अनेक आण्विक तळ इस्फहान शहरात आहेत. या शहरात इराणमधील युरेनियम संवर्धनाचे मुख्य केंद्रही आहे.  इराणने दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलचे अनेक ड्रोन पाडले आहेत.


एकमेकांना लक्ष्य करण्याऐवजी तार्‍यांवर रॉकेट पाठवा ! – इलॉन मस्क यांचा सल्ला

इराण आणि इस्रायल यांच्यामधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार्‍या ‘टेस्ला’ या अमेरिकेतील प्रसिद्ध आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी त्यांना सल्ला दिला आहे. ‘एकमेकांना लक्ष्य करण्याऐवजी तार्‍यांवर रॉकेट पाठवा’, असे त्यांनी म्हटले आहे.


या आक्रमणानंतर इराणचे तेहरान आणि इस्फहान या शहरांमधील सर्व विमान वाहतूक थांबवली आहे. इस्रायलने या आक्रमणाद्वारे इराणला चेतावणी दिली आहे की, इराणची अण्वस्त्रांची ठिकाणे त्याच्या टप्प्यात आहेत.