अमळनेर येथे श्री पेडकाईमाता आणि सप्तशृंगीमाता मंदिरांच्या जीर्णोद्धारानिमित्त विशेष पूजा !

श्री पेडकाईमाता

अमळनेर – येथील आर्.के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाईमाता आणि श्री सप्तशृंगीमाता यांचे छोटेखानी मंदिर बांधले होते. तेथे ते नित्य सेवाही करत होते; मात्र ते भाविक अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याने मंदिर दुर्लक्षित झाले. ‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’चे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना हे समजले. श्री पेडकाई माता ही त्यांची कुलदेवी असल्याने त्यांनी तात्काळ मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रसिद्ध कलावंत गणेश सपकाळे यांनी मंदिराचे रंगकाम केले. तेथील मूर्तीही रंगवण्यात आल्या. रामनवमीनिमित्त डॉ. महाले यांनी ज्यांची कुलदेवता पेडकाईमाता आहे, अशा स्थानिक परिसरातील काही भाविकांना तेथे बोलावले. सर्वांनी रामनवमीनिमित्त विशेष पूजा करून आरत्या म्हटल्या.

या वेळी उद्योगपती विनोद भैया पाटील, उद्योगपती बिपीन बापू पाटील, लोकमतचे रवींद्र बोरसे, अधिवक्ता संदीप बोरसे, जान्हवी बोरसे, प्रशांत महाले, रवींद्र बोरसे, अमोल बोरसे, राजेंद्र महाले, तेजू बोरसे, कैलास बोरसे उपस्थित होते. यतीन जोशी यांनी पौराहित्य केले.

जमलेल्या भाविकांनी मंदिराची नित्यसेवा आळीपाळीने करण्याचे ठरवले. शहरात सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये करावीत, असे ठरले.