पुणे – पुणे जिल्ह्यात १३ पैकी १० तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. जिल्ह्यातील ११७ गावांसह ७६२ वाड्या-वस्त्यांमधील सव्वादोन लाख नागरिकांची तहान टँकरने भागवली जात आहे. जिल्ह्यात आज १४८ टँकर चालू आहेत. त्यामध्ये पुरंदर, बारामती, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत सर्वाधिक टँकर चालू आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी अल्प पडलेल्या पावसाचा फटका काही तालुक्यांना बसला आहे. डिसेंबरपासून काही तालुक्यांमध्ये टँकर चालू आहेत. तेव्हापासून पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असतांना सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुका वगळता अन्य १० तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये पुरंदर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई दिसत आहे. सातारा जिल्ह्यात १६२, सांगलीमध्ये ९३, सोलापूर जिल्ह्यात ६४ टँकर सध्या चालू आहेत. कोल्हापूरमध्ये अद्याप टँकरची आवश्यकता भासत नाही. पाणीटंचाईमुळे पुणे विभागातील ८ लाखांहून अधिक लोकसंख्या, तर पावणेतीन लाख जनावरे बाधित झाली आहेत.