इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. अभय निगम (डावीकडे) यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना साधक श्री. अभिजित सावंत

रामनाथी (गोवा) – मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले. श्री. निगम यांनी सर्व माहिती अत्यंत आस्थेने आणि जिज्ञासेने जाणून घेतली.

श्री. निगम यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी रुची दर्शवली. स्वत:ला पालटण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत ? याविषयी, तसेच गुरुकृपायोग आणि आध्यात्मिक संशोधन यांविषयीची माहिती त्यांना विशेषत्वाने आवडली.

श्री. अभय निगम यांचा संक्षिप्त परिचय !

श्री. निगम हे मूलत: मेकॅनिकल इंजीनियर असून त्यांनी ‘फिलिप्स’सारख्या प्रथितयश आस्थापनांमध्ये कार्य केले आहे. अनेक वर्षे ते नोकरीनिमित्त युरोपात वास्तव्यास होते. सध्या ते इंदूर येथे स्थायिक असून तेथे त्यांचा व्यवसाय आहे; परंतु त्यांचा मूळ पिंड अध्यात्माकडे असल्याने ते स्वत: ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. यासह सामाजिक कार्य म्हणून ते युवावर्गाला सनातन धर्माविषयी मार्गदर्शनही करतात.