काठमांडू (नेपाळ) येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन !

आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी पुन्हा राजेशाही स्थापन करण्याची मागणी होत आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. १५ एप्रिल या दिवशी राजधानी काठमांडू येथे हिंदु राष्ट्रासाठी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा माराही केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलक प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, त्या वेळी झटापट झाली.

सौजन्य ANI News

१. आंदोलकांना देशातील राष्ट्रवादी ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी’चा पाठिंबा आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी हा नेपाळमधील पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाने फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान कार्यालयाला ४० कलमी निवेदनही पाठवले होते. यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे प्रवक्ते मोहन श्रेष्ठ म्हणाले की, राजेशाहीची पुनर्स्थापना, हिंदु राष्ट्र आणि संघराज्य व्यवस्था या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.

२. याआधी १० एप्रिललाही आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी आंदोलकांनी  पंतप्रधान कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालये यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ‘आम्हाला आमच्या देशावर आणि राजावर आमच्या जिवापेक्षा अधिक प्रेम आहे. प्रजासत्ताक रहित करून देशात राजेशाही परत आली पाहिजे’ अशा घोषणा दिल्या होत्या.

३. वर्ष २००७ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष देश’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर वर्ष २००८ मध्ये राजेशाही अधिकृतपणे संपुष्टात आली. तेव्हापासून आतापर्यंत नेपाळमध्ये १३ सरकारे सत्तेवर आली. या काळात भ्रष्टाचार वाढला, तसेच देश राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला आहे. नेपाळी राजकारणी चीनचे बटिक झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

छोट्याशा नेपाळमध्ये हिंदु ‘हिंदु राष्ट्रा’साठी आंदोलन करतात; मात्र भारतातील हिंदु असे काही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !