भिंगार – आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवणे आवश्यक आहे. कलियुगातील मानवाच्या कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. तप सामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. ‘या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या’, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.
येथील नेहरू चौकामधील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानाने आयोजित केलेल्या गुढीपाडवा महोत्सवात ‘दैनंदिन जीवनात नाथांचा आधार’ या विषयावर ते बोलत होते. श्री. सागर फुलारी यांनी स्वागत केले. श्री. रामभाऊ पांढरे यांनी मिलिंद चवंडके यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून दिला. श्री. विजय केदारी महाराजांनी श्री. चवंडके यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मानित केले.
श्री. चवंडके पुढे म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतल्याचा उल्लेख ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात आहे, तसा श्रीमद्भागवत ग्रंथातील पाचव्या स्कंधामध्येही आहे. हिंदु धर्म शुद्धी हेच नवनाथांच्या अवताराचे प्रयोजन होते. गुरुभक्ती, योगसाधना आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम असलेला नाथसंप्रदाय शुद्ध आचरणाची शिकवण देणारा आहे. भारताच्या मध्ययुगीन कालखंडात आध्यात्मिक साधनेचे सुवर्णयुग निर्माण करण्याचे मोलाचे योगदान नाथसंप्रदायाने दिले. प्राणीहत्या करत मांसाहार करण्यापेक्षा शुद्ध शाकाहारी भिक्षा श्रेष्ठ हे सांगितले. त्यामुळेच अन्नदानास नाथसंप्रदायात पुष्कळ महत्त्व प्राप्त झाले.’’
प्रवचन सोहळ्यास भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिलराव लालबोंद्रे, छावणी परिषदेचे नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, अरुण फुलारी, बाबू नायकू, किशोर फुलारी, भीमराव लालबोंद्रे, रणजित रासकर, राजेंद्र परदेशी, योगेश नायकू, लक्ष्मण नामदे (चिंचवड, पुणे), अक्षय नायकू, दीपक नायकू, तेजस लालबोंद्रे, संदीप मालवंडे, आनंद नायकू, सचिन बिडकर यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैतन्य कानिफनाथ आस्थाना भक्त मंडळ, नवरंग ग्रुप, नेहरू चौक तरुण मंडळ आणि बालगोपाल या सर्वांनी गुढीपाडवा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेतले. गुढीपाडवा महोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली.
नवनाथ दुःखीतांची दुःखे दूर करण्यासाठी आपल्या प्रभावी मंत्रशक्तीचा-तप सामर्थ्याचा वापर करत असत. मंत्र, तंत्र, यंत्र सिद्ध करून दुःखीतांच्या दुःखावर हळूवार फुंकर घालत निरपेक्षपणे दुःख मुक्त करावे, याचा कृतीशील आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. प्रापंचिकांच्या समस्या सोडवतांना प्रपंचात गुंतून न पडता आत्मोद्धार करून घ्या, असा सल्लाही दिला. परमात्मा सृष्टीरूपाने नटला आहे, याकडे लक्ष वेधत पर्यावरण संरक्षणाचे संदेश दिले. गोरक्षनाथांनी गोवरगिरीत जन्म घेऊन गोमातांचे शेण अत्यंत पवित्र असल्याचे दाखवून दिले.
मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग यांच्या साहाय्याने शिवरूप होण्याचे गूढ िवषद करत जीवनमुक्तीचे रहस्य निवेदन केले. कडक ब्रह्मचर्य, योगसाधना आणि शिवउपासना यामधून हिंदु धर्माला शुद्धतेच्या उच्च पातळीवर नेले. तिबेटी परंपरेतही स्थान मिळवलेल्या नाथ संप्रदायाने महाराष्ट्रामधील विविध साधना प्रणालींशी समन्वय साधला. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत बहरलेल्या तंत्रसाधनेवर नाथ संप्रदायाने वेगळेपणाचा ठसा उमटवला. योगप्रधान शिवयुक्त अनुभूतींनाच प्रमाण मानले. वामाचारी विकृत साधनांच्या निर्मूलनासाठी आणि भारतीय धार्मिक जीवनाच्या शुध्दीकरणासाठीच नवनाथ अवतरले, असे श्री.चवंडके यांनी विविध आख्यायिका आणि प्रसंगामधील गूढ उकल करून देत सांगितले.