शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेविषयी उदासीनता !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी वापराच्या इमारतींमध्ये अग्नीसुरक्षा यंत्रणेविषयी उदासीनता असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षण मोहिमेत आढळून आले आहे. या अनास्थेला उत्तरदायी असणार्‍या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास कठोर कारवाईची चेतावणी अग्नीशमन विभागाने दिली आहे. (केवळ चेतावणी देऊन न थांबता ठराविक समयमर्यादा ठेवून त्यांना शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)

तळवडे, चिखली भागातील दुर्घटना लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते. अग्नीशमन विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये धोकादायकपणे व्यवसाय चालू असलेल्या आणि उपाययोजना न केलेल्या १ सहस्राहून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. निवासी इमारतींमध्ये व्यवसाय आणि व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य अशा मिश्र स्वरूपाची सूत्रे आढळून आली आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी अग्नीशामक विभागाचे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.

नियमानुसार ‘आय.एस्.आय.’ मानांकन असलेले ६ किलोग्रॅम क्षमतेचे एबीसी फायर एक्स्टिंग्विशर, १० किलोचे मॉड्युलर एक्स्टिंग्विशर, मॅन्युअल फायर अलार्म, एल्पीजी गॅस डिटेक्शन सिस्टीम, फायर होझ, होझ रील होझ, फायर पंप इत्यादी यंत्रणा आवश्यक आहेत. अपेक्षित कार्यवाही न झाल्यास वीज तोडणे, नळजोड खंडित करणे किंवा मालमत्ता सीलबंद करणे आदी कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी पिंपरी महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

संपादकीय भूमिका :

  • समाजाला शिस्त न लावल्याचा परिणाम !
  • जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !