ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची तक्रार !

१७ महिन्यांच्या मुलाला घेऊन पत्रकार परिषद घेतल्याचा आक्षेप !

सुषमा अंधारे

नागपूर – येथे २ दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वर्धा येथील खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पूजा तडस यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी अंधारे यांनी तडस यांच्या १७ महिन्यांच्या नातवालाही मंचावर उपस्थित केले होते. याला राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या आयुक्तांनी अंधारे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, तसेच ‘लहान मुलाला अशा पद्धतीने पत्रकार परिषदेत आणून त्याचा वापर प्रचारात केल्याविषयी सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे.

राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अधिवक्त्या सुशीबेन शहा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय लाभासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्ह आहे; मात्र सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवले आहेत. या प्रकरणाची नोंद घेऊन हे पत्र लिहिले आहे. ‘याविषयी कठोर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली.

आयोगाचे नियम काय ?

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निर्देशांनुसार प्रचारसभा, मोर्चा, घोषणा देणे, भित्तीपत्रक चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही. राजकीय नेते आणि उमेदवार यांनी लहान मुलांना हातात धरून, वाहनात किंवा फेरीत घेऊन जाणे, तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.