३ आठवड्यांनंतर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट होत आहे ‘स्लीपर हिट’ !

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी अनेक खेळ होत आहेत प्रायोजित !

(स्लीपर हिट म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाभत असलेल्या लोकप्रियतेत हळूहळू वाढ होत जाऊन ती मोठ्या प्रमाणात मिळणे.)

मुबंई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आणि अभिनेते रणदीप हुडा यांनी भूमिका वठवलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३ आठवडे झाले आहेत. चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जात असून त्याचे ‘स्लीपर हिट’च्या दिशेने मार्गक्रमण चालू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून ‘सनातन प्रभात’ला मिळाली आहे. तिसर्‍या आठवड्यातील अनेक खेळ ‘हाऊसफूल’ झाले असून ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘मैदान’ आदी चित्रपटांपेक्षा तो अधिक सरस असल्याचे निष्पन्न होत आहे. चित्रपटाने आता चौथ्या आठवड्यात पदार्पण केले आहे.

चित्रपटाला महाराष्ट्र राज्यासह देशातील महानगरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रादेशिक स्तरावर पुष्कळ लोकप्रिय झाला आहे. सध्या चित्रपट ‘सेमी-हिट’ झाल्याचे म्हटले जात असून तो ‘स्लीपर हिट’ होईल, असे आता मानले जात आहे. सेमी-हिट म्हणजे चित्रपट प्रदर्शित करणार्‍यांनी गुंतवलेल्या रकमेच्या तुलनेत चित्रपटाच्या व्यवसायातून त्यांना दुप्पट रक्कम मिळणे. चित्रपटाचे अनेक खेळ हे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी प्रायोजित करण्यात येत आहेत. यामुळे सावरकर यांचे जीवन, तसेच स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेले क्रांतीकार्य या विषयांवर आधारित पुस्तकांच्या विक्रीतही कमालीची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.