नुकतेच होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा हे सण उत्साहात साजरे झाले. पुण्यातील ‘कॉर्पाेरेट’जगत मात्र याला अपवाद ठरले ! कार्यालयीन कामानिमित्त पुण्यातील काही ‘आयटी’(माहिती-तंत्रज्ञान) क्षेत्रांत कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये जाण्याचा योग आला. तेथे गेल्यानंतर हिंदु सण,परंपरा यांविषयी कमालीची उदासीनता दिसून आली. या आस्थापनांमध्ये गेल्यानंतर ‘आपण भारतात रहातो कि परदेशात ?’, असा प्रश्न काही क्षणांसाठी मनात आला ! संस्कृतीप्रधान शहर म्हणून नावाजलेल्या पुण्यात अनेक ‘आयटी’ आस्थापने आहेत. येथे असलेल्या आस्थापनांमध्ये जाणारा बहुतांश नोकरदारवर्ग हा पुण्यात रहाणारा, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अर्थार्जनासाठी पुण्यात स्थायिक झालेला असा आहे. बहुतांशी हिंदु असूनही हिंदूंच्या परंपरा जपण्यासाठी, त्यांचे सण, उत्सव साजरे करण्यासाठी या आस्थापनांतील वातावरण अनुकूल नाही. काही आस्थापनांमध्ये तर देवतांच्या मूर्ती किंवा चित्रेही आपल्याला पहायला मिळणार नाहीत. लोकमान्य टिळक यांनी ‘सर्व समाज उत्सवप्रिय व्हावा’, या उद्देशाने मंदिरांतून मंडपात स्थापलेल्या मूर्तीला आज या ‘कॉर्पाेरेट’ जगताने मात्र केवळ सोपस्कार म्हणून दारात ठेवून दिले आणि या मूर्तीसमोरूनच सर्व कर्मचारी चपला घालून त्यांच्या जागेवर जाऊन काम करत बसतात. यांपैकी बहुतांश हिंदु असूनही एकालाही अशा चुकीच्या गोष्टींविषयी जाणीवही न होणे अथवा त्याविषयी काहीही कृती न करणे, हे अधिक लाजिरवाणे आहे.
‘कॉर्पाेरेट’ जगतातील बुरसट आणि ढोंगी निधर्मीवाद
गणेश चतुर्थीला एका आस्थापनात गेल्यानंतर तेथील अधिकार्याला न रहावल्याने विचारले, ‘‘तुम्ही श्रीगणेशाची आरतीही करू शकत नाही का ?’’ तेव्हा तेथील अधिकार्याने उत्तर दिले, ‘‘बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये अशीच परिस्थिती असून एखादी धार्मिक कृती केल्यास अन्य धर्मीय कर्मचार्यांना त्याचे वाईट वाटू शकते अन् अशी कृती करणार्यावर कारवाई होऊ शकते.’’ आरती करण्यासारख्या कृती आस्थापनांच्या तत्त्वांत बसत नाहीत. एवढेच काय, गुढीपाडव्याला ‘ऑप्शनल हॉलीडे’ (पर्यायी सुटी) असणे, ही ‘कॉर्पाेरेट’ जगतात फोफावलेल्या निधर्मवादाची एक झलक आहे ! आज देश विश्वगुरु बनण्यासाठी मार्गस्थ व्हावा, अशी मनीषा बाळगणारे अनेक संत-महंत, राष्ट्रहितैषी, राष्ट्रप्रेमी नागरिक त्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत आहेत; पण या ‘कॉर्पाेरेट’ जगतात असलेला बुरसट आणि ढोंगी निधर्मीवाद अजूनही ‘जैसे थे’च आहे.
या निधर्मीवादाला छेद देऊन हिंदु परंपरा, सण-उत्सव यांविषयी जागृती होणे अत्यावश्यक आहे. नोकरी गमावण्याच्या भीतीने सर्व सहन करून अर्थार्जनासाठी नोकरी करणार्या आजच्या युवकाने खरेतर जागृत होऊन, संघटन करून हिंदुत्वाचे वातावरण या जगतातही निर्माण करायला हवे ! स्वातंत्र्यवीर सावरकर ‘संस्कृती जोपासून सभ्यता शिकावी,’ असे सांगत. स्वामी विवेकानंद यांनी आंग्लभाषेत बोलतांना ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणत हिंदु संस्कृतीतील सर्वबंधुत्वाचे दर्शन सार्या जगाला घडवले होते. अशाच प्रकारे धर्माभिमानी होऊन हिंदु परंपरांचे पालन करणे आणि इतरांनाही ते करायला प्रवृत्त करणे, यात कसलीही लाज अथवा भीती बाळगण्याचे कारण नाही. सध्या वातावरणही अनुकूल असतांना सर्वश्रेष्ठ संस्कृतीचा पुरस्कार करण्यात या हुशार, बुद्धीवादी तरुण-तरुणींनी पुढाकार घ्यायला हवा !
– श्री. केतन पाटील, पुणे