व्हिएतनाममध्ये अब्जाधीश महिलेला २ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी फाशी होणार !

घोटाळ्याची रक्कम ही देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तब्बल ३ टक्के !

मध्यभागी टुओंग माय लॅन

हॅनोई (व्हिएतनाम) – येथील अब्जाधीश असलेल्या महिला बांधकाम व्यावसायिक टुओंग माय लॅन यांना देशातील सर्वांत मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनुमाने २७ अब्ज डॉलर्सचे (२ लाख २२ सहस्र ३०० कोटी रुपयांचे) हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. ही रक्कम व्हिएतनामच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तब्बल ३ टक्के आहे.

‘व्हॅन थिन्ह फाट’ नावाच्या बांधकाम आस्थापनाच्या ६७ वर्षीय टुओंग माय लॅन या अध्यक्षा आहेत. एक दशकाहून अधिक काळ सायगॉन कमर्शियल बँकेच्या निधीची उधळपट्टी केल्याच्या आरोपात त्या दोषी आढळल्या. तसेच वर्ष २०१२ ते २०२२ या कालावधीत त्यांनी सरकारी अधिकार्‍यांना लाच देऊन सायगॉन जॉइंट स्टॉक कमर्शियल बँकेवर बेकायदेशीरपणे नियंत्रण ठेवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. लॅन यांच्याव्यतिरिक्त लाच घेणे, सत्तेचा गैरवापर, फसवणूक आणि बँकिंग कायद्याचे उल्लंघन यांसारख्या आरोपांवरून इतर ८५ जणांविरुद्धही निकाल देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

व्हिएतनामसारख्या देशात भ्रष्टाचार्‍यांना फाशी दिली जाते, यावरून भ्रष्टाचारग्रस्त भारताने बोध घेणे आवश्यक !