आज ‘मत्स्य जयंती’ ! त्या निमित्ताने मत्स्यावताराचे भावचित्र आणि भावकाव्य त्याच्या सुकोमल चरणी अर्पण !
‘वर्ष २०१३ मध्ये मला देवाच्या कृपेने मत्स्यावताराच्या रूपात श्रीमन्नारायणाचे सु-दर्शन (सुंदर दर्शन) झाले. त्या वेळी त्याच्याच कृपेने माझ्याकडून त्याचे भावचित्र रेखाटले गेले आणि त्याच्या दिव्य लीलांचे वर्णन करणारी भावकविता स्फुरली. मत्स्य जयंतीच्या निमित्ताने हे भावचित्र आणि हे भावकाव्य त्याच्या सुकोमल अन् पावन चरणी शरणागतभावाने अर्पण करत आहे. ‘पृथ्वीवर येणार्या भीषण आपत्काळात श्रीमत्स्यावताररूपी श्रीमन्नारायणाने आम्हा सर्व साधकांचे रक्षण करून आम्हाला तारून न्यावे’, हीच श्रीचरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.
श्रीहरि आहे जगताचा पालनहार।
तोच आहे संपूर्ण ब्रह्मांडाचा मूलाधार।। १।।
सृष्टीच्या आरंभी होता हयग्रीव नावाचा एक दानव।
त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते समस्त मानव।। २।।
‘हयग्रीव’असे कश्यपऋषि आणि दनु यांचा दानवी पुत्र।
या बलाढ्य दानवाचे असे वर्चस्व सर्वत्र।। ३।।
त्याच्या दशहतीमुळे त्रस्त झाले होते सर्व प्राणिमात्र।
त्यांची अवस्था झाली होती अत्यंत गलितगात्र।। ४।।
हयग्रीवाने ब्रह्मलोकातून चार वेद चोरून नेले।
त्यांना बंदीवान करून पाताळात लपवून ठेवले।। ५।।
त्यामुळे संपूर्ण सृष्टीतील धर्मज्ञान लुप्त झाले।
परिणामी सर्वत्र अधर्म आणि अनाचार माजले।। ६।।
सृष्टीच्या दुःस्थितीपासून तिचे करण्या रक्षण।
आणि दावनांचे करण्या संपूर्ण निर्दालन।। ७।।
श्रीविष्णूंनी वेळोवेळी दशावतार करूनी धारण।
धर्मसंस्थापनपेसाठी पृथ्वीवर केले अवतरण।। ८।।
मत्स्याचे रूप धारण करूनी प्रगटला मत्स्यावतार।
हा होता दशावतारांपैकी श्रीविष्णूचा पहिला अवतार।। ९।।
श्रीहरिविष्णु आहे सृष्टीचा तारणहार।
तोच दशावतार घेऊन करतो असुरांवर प्रहार।। १०।।
देवतांचे दमन करत होता हयग्रीवाचा मद।
वेदांच्या मुक्तीसाठी मत्स्यावताराने केला त्याचा वध।। ११।।
भूदेवी दानवांच्या दास्यत्वातून मुक्त झाली।
श्रीमन्नारायणाच्या कृपेने सर्व सृष्टी आनंदी झाली।। १२।।
पृथ्वीवर येणार होते प्रलयाचे भीषण संकट।
हे पाहून दाटून आला भूदेवीचा भाव उत्कट।। १३।।
मत्स्यावताराने मनूला साक्षात् दृष्टांत दिला।
अन् त्याला नवयुगाच्या आरंभाचा संकेत दिला।। १४।।
मनूने सर्व वृक्षांची बिजे एकत्र केली।
संगे पशूपक्षांच्या जोड्या घेऊ सर्व सिद्धता केली।। १५।।
अखेर सृष्टीच्या महाप्रलयाचे संकट समीप आले।
मनूने सर्वांना नौकेत नेऊन आश्वस्त केले।। १६।।
सप्तर्षींसह मनूने मत्स्यावताराला आर्तभावाने प्रार्थना केली।
प्रलयातून तारून नेण्यासाठी व्याकुळतेने त्याची याचना केली।। १७।।
मत्स्यावताराच्या शिंगाला वासूकीनागाच्या मुखाची बाजू बांधली।
त्याच्या शेपटीचे टोक नावेला बांधून ती मत्स्यावताराला जोडली।। १८।।
मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्राचे पाणी।
हा महाप्रलय पाहून घाबरून गेले नावेतील सर्व प्राणी।। १९।।
मत्स्यावताराने नावेला ओढून एका किनारी आणले।
अशा प्रकारे नावेतील प्राणीमात्रांना महाप्रलयातून वाचवले।। २०।।
भूमी पहाताच सर्व जण हर्षित झाले।
देव नारायणाच्या कृपेने मोठे संकट टळले।। २१।।
मत्स्यावताराचे रूप त्यागून श्रीमन्नारायण प्रगट झाले।
त्याच्या मुखातून चारही वेद पुन्हा सगुणातून अवतरित झाले।। २२।।
त्याने मनुसहित सप्तर्षींना मूळ रूपात दर्शन दिले।
अन् त्यांना नवीन सृष्टीच्या निर्मितीचे महान कार्य सोपवले।। २३।।
अशा प्रकारे अधर्माचा नाश करून पुन्हा सनातनधर्म विजयी झाला।
ब्रह्मांडात वेदांची पुनर्स्थापना होऊन सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश पसरला।। २४।।
श्रीमन्नारायणाची ही दिव्य लीला पाहून भूदेवी पुलकित झाली।
तिने कृतज्ञताभावाने श्रीहरिचरणी पुष्पांजली वाहिली।। २५।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |