काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘कमिशन द्या, नाहीतर काम बंद करा’, अशी इंडिया आघाडीची नीती !

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

चंद्रपूर – काँग्रेस समस्यांची जननी असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला आहे. जेव्हा इंडिया आघाडीवाले षड्यंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. त्या वेळीही त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचा (परिवाराचा) विकास केला. वर्ष २०२४ ची लोकसभेची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी निवडणूक आहे. देशासाठी मोठे निर्णय घ्यायचे आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीने देशाला अस्थिरतेकडे वळवले आहे. याची प्रचीती महाराष्ट्राला आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची येथे ८ एप्रिल या दिवशी सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. माता महाकालीच्या पावनभूमीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून भाषणाचा प्रारंभ केला.