एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती नाही; मात्र ते भाजपमध्ये आले, तर स्वागतच !
नागपूर – ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती नाही; मात्र ते भाजपमध्ये आले, तर स्वागतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित झाला. या सभेच्या निमित्ताने लोकांमध्ये पुष्कळ उत्साह आहे. सध्या विदर्भात भाजप आणि महायुती यांना अनुकूल परिस्थिती आहे; मात्र मोदी यांच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याविषयी कोणतीही शंका नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ एप्रिल या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मधल्या काळात जरी त्यांची वेगळी भूमिका असली, तरी आज त्यांनाही मोदी यांनी देशाचा विकास केला असल्याचे मान्य असेल. मोदी यांनी नव भारताची निर्मिती केली आहे. ज्यांच्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका महत्त्वाची आहे, त्या सर्वांनी मोदी यांच्यासमवेत उभे राहिले पाहिजे. त्यामुळे मनसेही मोदी यांच्यासमवेत राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
सुनेत्रा पवार यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत ! – फडणवीस
नागपूर – बारामतीत सुनेत्रा पवार यांना मत म्हणजेच नरेंद्र मोदी यांना मत आणि सुप्रिया सुळे यांना मत म्हणजेच राहुल गांधी यांना मत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. बारामतीत पवारांचा पराभव हेच भाजपचे ध्येय असल्याचे वक्तव्य यापूर्वीही भाजप नेत्यांकडून अनेकदा झाले होते. या पार्श्वभूमीवर परत एकदा फडणवीस यांचे हे वक्तव्य त्याच ध्येयाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून भाजपने बारामतीत नरेंद्र मोदी यांनाच आणले आहे. |