K K Muhammed : मुसलमानांनी काशी आणि मथुरा येथील स्थळे हिंदूंना सुपुर्द करावीत ! –  ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद

पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात आयोजित व्याख्यान  

ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद

पुणे – आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक तथ्ये स्वीकारायला हवीत. मुसलमानांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत, त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्णजन्मस्थळ पवित्र आहेत. मुसलमानांच्या दृष्टीने तेथे केवळ एक मशीद आहे. त्यामुळे त्यांनी ती स्वतःहून हिंदूंना सुपुर्द करावी आणि हिंदूंनीही राष्ट्रहितासाठी येथेच थांबावे, असे आवाहन ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी केले. ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ येथे आयोजित ‘भारत : वारसा आणि संस्कृती’ या व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या उत्तर भारताचे माजी संचालक असलेले के. महंमद यांनी चंबळ खोर्‍यातील बटेश्‍वर मंदिर शृंखलेचे पुनर्निर्माण आणि राममंदिराच्या सर्वेक्षणाच्या संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाला ‘फोर्स मोटर्स’चे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, ‘पुणे संवाद’चे संयोजक मनोज पोचट आदी उपस्थित होते.

के.के. महंमद पुढे म्हणाले की,

१. काशी आणि मथुरा येथील जन्मस्थळाशी ना प्रेषित महंमद पैगंबर यांचा संबंध आहे, ना एखाद्या अवलियाचा संबंध आहे; परंतु हिंदूंसाठी ते देवांचे जन्मस्थान आहे. हिंदु समुदायाने मध्ययुगीन कालखंडात उद्ध्वस्त झालेली ३ ते ४ सहस्र मंदिरे मागितली नाहीत. त्यांनी तसे केले, तर देशात हाहा:कार माजेल. देशाच्या हिताच्या दृष्टीने हिंदूंनी येथेच (काशी आणि मथुरा ही स्थाने परत मिळण्यापुरतेच) थांबावे.

२. मध्ययुगीन कालखंडात झालेल्या आक्रमणाला आणि मंदिर विध्वंसासाठी आजचे मुसलमान उत्तरदायी नाहीत; मात्र या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणारे नक्कीच दोषी आहेत. माझ्या पूर्वजांकडून भारतातील सहस्रो मंदिरांचा विद्ध्वंस झाला. त्याचा आत्मक्लेष म्हणून माझ्या हातून मी प्राचीन मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे कार्य झाले.