‘उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (९.४.२०२४) या दिवशी वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांचा ५३ वा वाढदिवस आहे. मी अनुमाने २० वर्षांपासून अध्यात्मप्रचार सेवेत असल्यापासून मायाताईंना ओळखतो. मागील १० वर्षे मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असल्याने माझा त्यांच्याशी सतत संपर्क येतो. मायाताईंच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांना ५३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. शिकण्याची वृत्ती
‘साधकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचा लाभ व्हावा’, यासाठी मायाताई वेगवेगळ्या चिकित्सापद्धती आणि औषधोपचार यांविषयी शिकून घेतात.
२. प्रेमभाव
त्या रुग्णाईत साधकांना तत्परतेने साहाय्य करतात. ‘साधकांचे त्रास दूर होऊन साधकांना साधना आणि सेवा करतांना आनंद मिळायला हवा’, असा मायाताईंचा विचार असतो. यातून ‘साधकांची एखादी अडचण मुळाशी जाऊन सोडवणे आणि त्यासाठी उपाययोजना काढणे’ ही ताईंमधील तळमळ दिसून येते.
३. सेवेची तळमळ
ताई आश्रम स्वच्छता, स्वयंपाकघरातील सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा आणि रुग्णसेवा तळमळीने अन् मन लावून करतात. त्यांना आयत्या वेळी कोणतीही सेवा दिली, तरीही त्या ती सेवा आनंदाने स्वीकारून तळमळीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
४. तत्त्वनिष्ठ
‘सहसाधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि त्यांच्याकडून गुरुकार्याची हानी होऊ नये’, हे लक्षात घेऊन ताई साधकांच्या लक्षात आलेल्या चुका त्यांना तत्त्वनिष्ठतेने सांगतात. ताईंकडे ज्या सेवांचे दायित्व आहे, तेथे त्या कुठलीही सवलत न घेता सेवा करतात.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
ताईंच्या मनात ‘गुरुदेवांनी त्यांना कसे घडवले आहे !’, याविषयी कृतज्ञताभाव असतो. ‘ताईंमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अतूट भाव असल्याने ते ताईंकडून भावपूर्ण सेवा आणि साधना करून घेत आहेत, तसेच ते ताईंची आध्यात्मिक प्रगतीही करून घेत आहेत’, असे मला वाटते.
६. जाणवलेले पालट
अ. ताईंमध्ये पूर्वीपेक्षा सकारात्मकता आणि आनंदी वृत्ती वाढली आहे.
आ. पूर्वी ताई पुष्कळ भावनाशील होत्या. ‘आता त्यांच्यात सेवेप्रती आणि देवाप्रती भाव निर्माण होत आहे’, असे मला वाटते.
इ. त्या साधकांच्या अडचणी आत्मीयतेने ऐकून घेतात. ‘ताई साहाय्य करतील’, अशी साधकांना निश्चिती असते.
ई. ‘त्यांची सेवा आणि साधना करण्याची तळमळ अन् त्यांच्यातील परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव यांत वृद्धी होत आहे’, असे मला जाणवते.
‘मायाताईंच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्यांची शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.२.२०२४)