जागरण-गोंधळ धार्मिक विधीत अश्लीलता आणणार्‍या लोकांवर कारवाई करा !

गोंधळी समाजसेवा संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

धाराशिव – महाराष्ट्रातील प्राचीन अशा जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केला असल्याची तक्रार ‘गोंधळी समाजसेवा संघटने’ने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. अशा प्रकारे धार्मिक विधीचे हनन करणार्‍या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश लोंढे, उपाध्यक्ष मारुति इगवे आणि अन्य पदाधिकारी यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागरण आणि गोंधळ हा प्राचीन धार्मिक विधी आहे. यातील कुळाचार विधी म्हणजेच गोंधळ हा श्री तुळजाभवानीदेवीची उपासना करणारा आहे, तर जागरणाद्वारे खंडेरायांची उपासना केली जाते. नवस, लग्न, मुंज, वास्तूशांती, नवरात्र अशा विधीप्रसंगी हे धार्मिक विधी केले जातात; मात्र अलीकडील काळात काही लोकांनी याला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. या विधीकाळात तमाशातील वाद्य, ढोलकी, ऑर्गन ढोल वाजवून अश्लील नृत्य केले जात आहे. यामुळे पारंपरिक जागरण-गोंधळ या धार्मिक विधीला बीभत्स स्वरूप आणून मूळ विधीला हानी पोचवली जात आहे.