केंद्र सरकारने पालटले जन्म प्रमाणपत्राचे नियम
नवी देहली – केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या आदर्श नियमांनुसार आता मुलाच्या जन्माची नोंदणी करतांना मुलाचे वडील आणि आई दोघांनाही स्वतंत्रपणे त्यांच्या धर्माचा उल्लेख करावा लागणार आहे. पूर्वी केवळ कुटुंबाचा धर्म नोंदवला जायचा. मूल दत्तक घेण्याच्या बाबतीतही हा नियम लागू असेल. नवीन नियमानुसार मूल दत्तक घेणार्या दोन्ही पालकांच्या धर्माचा उल्लेख करणे आवश्यक असेल.
११ ऑगस्ट २०२३ या दिवशी संसदेत जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा संमत करण्यात आला होता. ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू यांच्याशी संबंधित माहिती राष्ट्रीय स्तरावर संग्रहित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याचा उपयोग राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) अद्ययावत करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासोबतच मतदार सूची बनवणे, आधारकार्ड, रेशनकार्ड, पारपत्र, वाहन परवाना, मालमत्ता नोंदणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी याचा उपयोग होणार आहे.