रत्नागिरी – एप्रिल आणि मे या २ महिन्यांत उन्हाचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष चालू करण्यात आला आहे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.
‘ऑनलाईन’ सभेत ते बोलत होते. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.व्ही. जगताप आणि अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या सभेत उष्माघाताविषयी सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताविषयी कक्ष चालू करण्यात यावेत आणि उष्माघातापासून जनतेने बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या.
हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ३५ अंशापर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यकेंद्रातील उष्माघात कक्षात लागणार्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णांसाठी बेड, थंड पाण्याची व्यवस्था, पंखा यांसह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये म्हणाले की, उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास नजीकच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा. त्याला रुग्णालयात भरतीची आवश्यकता पडल्यास १०८ ॲम्बुलन्ससाठी संपर्क करावा.