Rape Victim Barred : बलात्कार पीडित विद्यार्थिनीला बारावीची परीक्षा देण्यापासून रोखले !

अजमेर (राजस्थान) येथील घटना !

अजमेर (राजस्थान) – येथील बलात्कार पीडित विद्यार्थिनीला बारावीची परीक्षा देण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजमेरच्या एका खासगी शाळेतील विद्यार्थिनीवर मागच्या वर्षी सामूहिक बलात्कार झाला होता. त्यामुळे या मुलीला आता बारावीच्या परीक्षेस बसू देण्यात आलेले नाही, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. पीडितेने शाळेच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘शाळेतील वातावरण बिघडेल’, असे कारण सांगून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले गेले नाही.

पीडितेच्या आरोपानंतर खळबळ उडाली. बाल कल्याण आयोगानेही या प्रकरणात आता लक्ष घातले आहे. सदर पीडिता मागील चार महिन्यांपासून शाळेत गेली नसल्यामुळे तिला परीक्षेस बसू देण्याची अनुमती दिली नाही, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे. बाल कल्याण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून खटला दाखल केला आहे.

बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षा अंजली शर्मा म्हणाल्या की, पीडित विद्यार्थिनीची मार्चमध्ये हुकलेली परीक्षा ती पुन्हा कशी देऊ शकेल, याकडे लक्ष देत आहोत.

काय आहे प्रकरण ?


ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित विद्यार्थिनीवर तिचे काका आणि इतर दोघे यांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने मुलीला शाळेत न येण्याचा सल्ला दिला. तिने घरूनच अभ्यास करावा, जेणेकरून शाळेचे वातावरण बिघडणार नाही, असे शाळेने सुचवले होते, अशी माहिती पीडितेने अंजली शर्मा यांना दिली आहे. शर्मा यांनी सांगितले की, पीडिता अभ्यासात अतिशय हुशार आहे. दहावीच्या परीक्षेत तिने ९७ टक्के गुण मिळवले होते. तिला बारावीच्या परीक्षेला बसू दिले, तर ती नक्कीच चांगले गुण मिळवेल; पण शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.