Maldives India Relation : (म्हणे) ‘भारत मालदीवचा चांगला मित्र आहे !’ – मालदीवचे अर्थमंत्री महंमद शफीक

माले – मालदीवचे अर्थमंत्री महंमद शफीक यांनी हिंद महासागरातील बेट मालदीवमध्ये परकीय सैन्याच्या उपस्थितीच्या विरोधात राष्ट्रपती मुइज्जू यांनी घेतलेल्या  भूमिकेचे समर्थन केले. ‘मालदीव अजूनही भारताला मित्र मानतो. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पर्यटकांच्या संख्येत भारत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत महंमद शफीक म्हणाले की, मालदीव सर्व देशांचा मित्र आहे. चिनी आणि भारतीय दोघेही सुटीचे ठिकाण म्हणून मालदीवला जाणे पसंत करतात. मालदीवचे राष्ट्रपती, सरकार आणि लोक येथे विदेशी सैन्याची उपस्थिती नाकारतात. मुइज्जू म्हणाले होते की, १० मे नंतर कोणताही भारतीय सैनिक, मग तो नागरी वेशभूषत का असेना, मालदीवमध्ये उपस्थित रहाणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारणार्‍या मुइज्जू यांनी जानेवारीमध्ये चीनला भेट दिली आणि दोन्ही देशांनी शस्त्रांस्त्रांचा पुरवठा आणि प्रशिक्षण यासह अनेक करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

संपादकीय भूमिका

मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, तसेच भारताऐवजी चीनला प्राधान्य दिले. यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे टाळले. त्यामुळे व्यापारावर परिणाम झाल्यामुळे त्या देशाचे अर्थमंत्री अशी वक्तव्ये करत आहेत !