रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात शिबिरासाठी आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. आश्रमातील मारुति आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

कु. स्नेहल संतोष मुळूक

१ अ. मारुतीच्या मूर्तीत शक्तीची स्पंदने जाणवणे : मी मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना मला शक्तीची स्पंदने जाणवली. माझ्यावर आलेले ‘त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

१ आ. मारुतिरायाच्या मुखावर ‘मारुतिराया हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी श्रीरामाला प्रार्थना करत आहे’, असा भाव जाणवणे : श्री. निरंजनदादा (श्री. निरंजन चोडणकर, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) म्हणाले, ‘‘मारुतिराया श्रीरामाला ‘हिंदु राष्ट्र लवकर येऊ दे’, अशी प्रार्थना करत आहेत. तेव्हा मी मूर्तीचे निरीक्षण केले. त्या वेळी मला मारुतिरायांच्या मुखावर अगदी तसाच भाव दिसत होता. मला मूर्ती सजीव वाटत होती.

१ इ. दृष्ट काढतांना मारुतिराया प्रत्येक वेळी प्रार्थना केल्यावर धावून येतात. आता ‘ते प्रत्यक्ष माझ्या समोर असून आता उठून मला आशीर्वाद देतील’, असे मला वाटले.

१ ई. श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्यावर देवीचे ओठ आणि पापण्या यांची हालचाल होत असल्याचे मला जाणवले. आता ‘माता प्रकट होईल’, असे मला वाटत होते.

२. आश्रमात एक मास राहून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्याचा विचार मनात येणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करून वडिलांना विचारल्यावर त्यांची अनुमती मिळणे : शिबिर संपल्यावर ‘लगेच घरी न जाता इथेच रहावे आणि अजून शिकावे’, असे मला वाटत होते. तेव्हा देवानेच मला ‘मी इथे एक मास राहू का ?’, असे बाबांना विचारण्याचा विचार दिला. त्या एक मासात आश्रमात राहून ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकूया’, असे मला वाटले. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून मी बाबांना विचारले. त्यावर त्यांची अनुमती मिळाली.

३. गुरुदेवांनी साधकांचा विचार करून त्यांना पुरवलेल्या सुखसोयी

आश्रमात आल्यावर ‘साधकांचा वेळ वाया न जाता साधकांची साधना सुखकर व्हावी’, यासाठी गुरुदेवांनी लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन सर्व सोयी पुरवल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले, उदा. भांडी घासतांना पंखा, स्नानगृह आणि शौचालय येथे वयोवृद्ध साधकांना उठतांना धरण्यासाठी स्टँड आणि रॉड, कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्रे इत्यादी.

४. भावसत्संगातील प्रत्येक सूत्र अंतर्मनापर्यंत जाणे आणि आश्रमात प्रत्येक भावप्रयोग अनुभवता येणे

येथील भावसत्संग दैवी असतो. सत्संगापूर्वी झोप आलेली असायची; पण सत्संगात सौ. वैष्णवी बधाले (पूर्वाश्रमीच्या कु. वैष्णवी वेसणेकर) अशी काही सूत्रे सांगायच्या की, ती अंतर्मनापर्यंत जायची. त्यामुळे सत्संग झाल्यावर विश्रांतीला न जाता मी ध्यानमंदिरात जाऊन नामजप करायचे. आश्रमात प्रत्येक भावप्रयोग असा अनुभवता येतो.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना झालेली विचारप्रक्रिया आणि आलेले अनुभव

५ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाल्यावर ‘आता विश्रांती न घेता परिश्रम करावे लागणार’, असे प्रारंभी वाटणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाल्यावर ‘आता मला विश्रांती न घेता परिश्रम करावे लागणार’, असे मला वाटले; पण इथे दायित्व असलेल्या साधिका सेवा पालटून द्यायच्या, तसेच ‘‘तुला जमतंय का ?’’ अशी प्रेमाने विचारपूसही करायच्या. इथे आवड आणि शारीरिक क्षमता बघून सेवा दिली जाते.

५ आ. चुका झाल्यानंतर आढाव्यात सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) प्रश्न विचारून अंतर्मुख करायच्या आणि दोषांच्या मुळाशी घेऊन जायच्या.

५ इ. आढाव्यांच्या माध्यमातून ‘गुरुदेव आज कोणते नवीन सूत्र सांगणार ?’, असा विचार माझ्या मनात यायचा. त्या उत्सुकतेमुळे मला आढाव्याचा ताण आला नाही.

५ ई. संघर्षामुळे मन अस्थिर झाल्यावर ‘संघर्षाला देवाकडे घेऊन गेल्यावर आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत’, असे अनुभवणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना मला ‘माझा संघर्ष कुठे होतोय ? मन कोणती परिस्थिती स्वीकारत नाही ?’, हे कळू लागले. मन अस्थिर झाले, तर ‘ते कोणत्या कारणाने होत आहे ?’, हे आढाव्यामुळे शोधता येऊ लागले. पूर्वी चूक झाल्यावर लक्षात यायची. आता चूक होत असतांना किंवा एखादा प्रसंग मनाला स्वीकारता येत नसतांना अहं जागृत होऊन ‘आता प्रतिक्रिया मनात येतील’, याची जाणीव व्हायची. तेव्हा मी गुरुदेवांनाच सांगायचे, ‘गुरुदेवा, माझे मन हे स्वीकारत नाही. मी काय करू ?’ तेव्हा ते मला सूक्ष्मातून म्हणायचे, ‘शरणागती आणि समर्पणभाव वाढव.’ मी तसे केल्यावर ते स्वीकारले जायचे. ‘संघर्षाला देवाकडे घेऊन गेल्यावर आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत’, असे मला अनुभवता आले आणि माझ्या कृतज्ञताभावात वाढ झाली.

५ उ. प्रत्येक वेळी फलकावर चूक लिहित असतांना संघर्ष न होता चूक लिहिल्यानंतर मनाला आज्ञापालन केल्याचे समाधान वाटायचे. आता मला समष्टीत चूक सांगणे जमू लागले.

५ ऊ. माझ्या मनात सवलत घेण्याचा विचार आला की, मला पू. रेखा काणकोणकर यांचे बोलणे आठवायचे. पू. रेखाताई म्हणायच्या, ‘‘प.पू. गुरुदेव ८० वर्षांचे आहेत; पण तरीही ते सतत कार्यरत असतात. तसे आपण कार्यरत रहायचे.’’ मग वेगळाच उत्साह यायचा.

६. स्वयंपाकघरात सेवा करतांना लक्षात आलेली सूत्रे आणि झालेले लाभ

अ. शरिराने सेवा असल्याने मनाने आपण अखंड भावाचे प्रयत्न करू शकतो.

आ. ‘भांडी घासण्यापासून लादी पुसण्यापर्यंत आणि भाजी चिरण्यापासून ती बनवण्यापर्यंत प्रत्येक सेवा गुरुसेवा आहे’, ही जाणीव दृढ होते.

इ. एखादी चूक होत असल्यास समष्टी त्याची लगेच जाणीव करून देते. त्यामुळे चुका पटकन लक्षात येतात.

ई. स्वयंपाकघरात विविध सेवा असल्याने लवकर परिपूर्णता येते, तसेच एकाच वेळी विविध सेवांकडे लक्ष असावे लागते. त्यामुळे ‘अष्टावधानी’ हा भगवंताचा गुणही आपल्यात येण्यास साहाय्य होते.

उ. शारीरिक श्रमामुळे शरणागतभावात रहायला साहाय्य होते.

ऊ. आपण प्रतिदिन देवाला प्रार्थना करतो. सतत त्याला काही तरी सांगतो आणि एक दिवस असे लक्षात येते की, देवाने ती प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे. मी देवाला जेव्हा मनापासून हाक मारली, त्या प्रत्येक वेळी तो धावून आला आहे.

७. कृतज्ञता

‘हे गुरुदेव, तुम्ही माझे ऐकत आहात’, ही जाणीव माझ्या अंतरात अधिक दृढ झाली आहे. तुम्हाला परतफेड म्हणून मी काहीच करू शकत नाही. माझ्यात पालट करून मी तुम्हाला केवळ आनंद देऊ शकते. ‘या वैकुंठात भयाला स्थान नाही. सगळीकडे निर्भयता आणि आनंद आहे; कारण इथे तुमचे अस्तित्व आहे.’ तुम्ही मला हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल मी येथील माझ्या प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आहे.’

– कु. स्नेहल संतोष मुळूक (वय १९ वर्षे), राजगुरुनगर, पुणे. (२१.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक