पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा संबंधित तरुणांचा आरोप !
पुणे – येथील लोणीकंद पोलीस ठाण्यात १ एप्रिलला रात्री सत्यवान गावडे आणि राम गजमल या २ तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचार्यांनी दोघांना वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाच्या (गुन्हे) हप्तेखोरीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोप संबंधित तरुणांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. गावडे यांनी पोलीस हप्ता मागत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांना कारवाईची भीती दाखवून पैसे आणि हप्ते उकळणार्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावडे यांनी केली आहे.
माझे हॉटेल आणि बार अधिकृत असूनही लोणीकंद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे हॉटेल चालू ठेवायचे असल्यास दर महिन्याला १० सहस्र रुपये हप्ता देण्याची मागणी करत होत्या. हप्ता देत नसल्याने हॉटेलवर जाणूनबुजून कारवाई करून त्रास दिला जात होता. त्यांच्या कारवाईला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप हॉटेलचालक सत्यवान गावडे यांनी केला आहे.
पोलीस तक्रारीची नोंद घेत नसल्याने फेब्रुवारीमध्ये एका तरुणाने वाघोली पोलीस चौकीत पेटवून घेतले होते. त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती लोणीकंद पोलीस ठाण्यात थोडक्यात टळली. त्यामुळे लोणीकंद पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवणार्या हॉटेलवर पोलिसांनी १ एप्रिलला पहाटे कारवाई केली. त्यामुळे चालकाने आणि कामगाराने १ एप्रिलला सायंकाळी लोणीकंद पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी हप्ता मागितल्याचा आरोप हॉटेलचालकाने केला आहे. त्याचा जबाब नोंदवून घेतला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिकाहप्तेखोरीला कंटाळून सामान्य नागरिक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या आरोपात खरोखरीच तथ्य असेल, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! |