महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्थानकांवरील धातूशोधक आणि ‘बॅग स्कॅनर’ यंत्र बंद 

प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे !

मिरज येथील रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले ‘बॅग स्कॅनर यंत्र’ नादुरुस्त असल्याने काढून ठेवले आहे

श्री. अजय केळकर, कोल्हापूर

कोल्हापूर – महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्थानकांवर मोठा गाजावाजा करून धातूशोधक आणि ‘बॅग स्कॅनर’ यंत्र बसवण्यात आले होते. या यंत्रांद्वारे प्रवाशांच्या बॅगांची पडताळणी केली जात असे. त्यामुळे कुठलीही धातूसदृष्य वस्तू अथवा अयोग्य वस्तू रेल्वेतून नेणे शक्य होत नसे. दुदैर्वाने ज्या रेल्वेद्वारे सहस्त्रो प्रवासी प्रवास करतात, त्यांची सुरक्षा-व्यवस्था सध्या धोक्यात असून कोल्हापूर, मिरज, सांगली, छत्रपती संभाजीनगर यांसह महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्थानकांवरील धातूशोधक, तसेच ‘बॅग स्कॅनर’ यंत्र बंद अवस्थेत आहेत.

संभाजीनगर रेल्वेस्थानकावर बंद अवस्थेत आणि धूळ खात पडून असलेले ‘डोअर मेटल डिटेक्टर यंत्र’

विविध ठिकाणच्या रेल्वेस्थानकांवर काही महिन्यांपूर्वी प्रवाशांची बॅग पडताळणी नियमितपणे होत असे. मिरज येथील हे यंत्र नादुरुस्त अवस्थेत असल्याने काढून ठेवण्यात आले आहे. याचसमवेत प्रवाशांनी आत जातांना त्यांच्याकडे धातूसदृश्य वस्तू असल्यास ते पडताळणीसाठी एका चौकटीसारखे यंत्र असते, तेही संभाजीनगर रेल्वेस्थानकावर बंद अवस्थेत आहे. या यंत्राची देखभाल-दुरुस्ती करण्याचे काम एका खासगी आस्थापनाकडे असून त्यांनी जी यंत्राच्या दुरुस्तीची रक्कम सांगितली आहे, ती रेल्वे विभागाला न परवडणारी असल्याने ते यंत्र सध्या धूळ खात पडून आहे.

सध्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे मद्याची तस्करी, पैशांची उलाढाल पकडण्यासाठी असे ‘स्कॅनर’ रेल्वेस्थानकांवर असणे अत्यावश्यक आहे; मात्र ‘स्कॅनर’ बंद असल्याने अशी तपासणी होत नाही. याचसमवेत एखादा प्रवासी सामानाद्वारे शस्त्र, अथवा अन्य कोणतीही घातक वस्तू घेऊन येत असेल, तर तेही पडताळणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने हे यंत्र चालू करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

रेल्वे प्रशासनाने यंत्र तात्काळ दुरुस्त करणे अपेक्षित ! – सुकुमार पाटील, मिरज रेल्वे कृती समिती

या संदर्भात ‘मिरज रेल्वे कृती समिती’चे सदस्य श्री. सुकुमार पाटील म्हणाले, ‘‘प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘बॅग स्कॅनर’ रेल्वे प्रशासनाने यंत्र तात्काळ दुरुस्त करणे अपेक्षित आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे आमचाही पाठपुरावा चालू आहे.’’