Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायलने गाझापट्टीत २ एप्रिलच्या रात्री केलेल्या आक्रमणात वर्ल्ड सेंट्रल किचन धर्मादाय ताफ्यातील ७ साहाय्यता कर्मचारी ठार झाले. हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते. यावर स्पष्टीकरण देतांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, दुर्दैवाने एक दुःखद घटना घडली आहे. गाझा पट्टीमध्ये आमच्या सैन्याने अनावधानाने साहाय्यता कर्मचार्‍यांची हत्या केली. सैन्याने चूक केली. या आक्रमणाचे आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. साहाय्यता कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला; पण युद्धात असे घडते. भविष्यात एकही निष्पाप जीव जाऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

१. धर्मादाय वर्ल्ड सेंट्रल किचनचे संस्थापक शेफ जोस आंद्रेस यांनी सांगितले की, साहाय्यता कर्मचारी धर्मादाय संस्थेचा लोगो असलेल्या २ चिलखती वाहनामध्ये होते. त्यांनी इस्रायली सैन्याला त्यांच्या आगमनाची माहिती दिली होती. असे असूनही सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले.

२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या आक्रमणावरून इस्रायलचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार युद्धात आतापर्यंत १९६ साहाय्यता कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.