पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – दक्षिण आशियातील सर्वांत मोठा देश असलेला भारत सध्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. हे या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असा फुकाचा आरोप पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाच्या बैठकीत केला.
१. पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी म्हटले की, भारताने ‘कोल्ड स्टार्ट’सारखे (युद्ध झाल्यास अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्यासाठी सैन्याला सिद्ध करणे) युद्ध लढण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे पाकिस्तानवर अचानक आक्रमण होण्याचा धोका वाढला आहे. आज भारत शस्त्रास्त्र खरेदीत आघाडीवर आहे. अनेक देश त्याला क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे आणि शस्त्रे पुरवत आहेत. भारत पाकिस्तानच्या विरोधात सातत्याने आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्य कारवाई न केल्यास, यामुळे जागतिक आपत्ती येऊ शकते. २० वर्षांपूर्वी दक्षिण आशियाला अण्वस्त्रमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. असे असतांनाही एका देशाने (भारताने) अण्वस्त्रांची चाचणी केली. त्यामुळे आम्हालाही अण्वस्त्रांची निर्मिती करणे भाग पडले.
२. जम्मू-काश्मीरच्या सूत्रावर मुनीर अक्रम म्हणाले की, अनेक दशकांच्या वादामुळे, दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे आहेत. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती बिघडली आहे. काश्मीरमध्ये लोकांच्या अधिकारांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर ४ वेळा आक्रमण केले आहे आणि त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तरीही अशा प्रकारचा कांगावा पाक करतो. यातून तो डावपेचांत किती हुशार आहे, हे लक्षात येते ! |