महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची पुन्हा चौकशी होणार !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि छगन भुजबळ

मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात निर्दाेष मुक्त केलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ, त्यांच्या सूना यांसह विकासक, कंत्राटदार आदी सर्वांची पुन्हा चौकशी होणार आहे. घोटाळाप्रकरणात या सर्वांना नोटीस पाठवावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर १ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

‘सर्व आरोपींना २९ एप्रिलपर्यंत नोटीस पाठवावी’, असा आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिला आहे. या नोटिसीनंतर ४ आठवड्यांत सर्व आरोपींना त्यांचे म्हणणे सादर करायचे आहे. घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते; मात्र सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता केली. सत्र न्यायालयात सबळ पुरावे दिले असतांना निर्णय आरोपींच्या बाजूने लागूनही भ्रष्टाचारविरोधी पथकाने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलेच नाही. याविषयी मुंबई सत्र न्यायालयापासून या प्रकरणी याचिका करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या याचिकेमुळे ही सुनावणी झाली.

सर्व आरोपींना शिक्षा होणारच ! – अंजली दमानिया

हा घोटाळा अतिशय मोठा आर्थिक अपहार आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सातभाई यांचा निर्णय कसा चुकीचा होता, याविषयीचे सर्व पुरावे आणि सर्व आरोपी कसे दोषी आहेत, हे मी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. हे काम भ्रष्टाचारविरोधी पथकाने करायला हवे होते. कदाचित राजकीय दबावामुळे पथकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली नसावी. त्यामुळे पथकाद्वारेच याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी उच्च न्यायालयात केली आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.