साधक, वाचक आणि हितचिंतक यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये घर बसल्या नोकरी देण्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सध्या पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
या प्रकारामध्ये घर बसल्या ‘डेटा एन्ट्री’ करण्यासाठी म्हणून दूरभाषवर संपर्क करून तसेच ‘व्हॉटस्ॲप’ प्रणालीवर संदेश करून नोकरीसाठी सांगितले जाते. नंतर व्यक्तीला घर बसल्या करू शकतो, असे काम दिले जाते. हे काम देण्यापूर्वी त्या कंपनीद्वारे ‘ऑनलाईन’ करार करून घेतला जातो. त्यामध्ये कामाबद्दल अटी घातलेल्या असतात. यानंतर काम सांगितलेल्या कालावधीत पूर्ण झाल्यानंतर करार केल्याप्रमाणे तुमच्याकडून योग्य प्रकारे ते काम झाले नाही, असा खोटा अहवाल (रिपोर्ट) दिला जातो.
त्यानंतर बोगस अधिवक्त्याच्या नावाने ‘ई-मेल’द्वारे कायदेशीर नोटीस पाठवली जाते की, तुम्ही केलेल्या चुकीच्या कामाबद्दल तुमच्यावर कलम लावण्यात आले आहेत. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अधिवक्त्याचा संपर्क येतो आणि तुमचा खटला न्यायालयात प्रविष्ट (दाखल) न करता तुम्हाला बंद करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून पैसे घेतले जातात. नंतर आस्थापनासमवेत केलेला करार रहित करण्यासाठी, लावण्यात आलेले कायदेशीर कलम रहित करण्यासाठी, तसेच भरलेल्या रक्कमेवर ‘जी.एस्.टी.’ भरण्यासाठी असे वेगवेगळे कारण सांगून त्या व्यक्तीवर दबाव आणला जातो. तसेच कायदेशीर कारवाईची धमकी देवून पैसे पाठवण्यास भाग पाडले जाते.
इथे लक्षात घेतले पाहिजे, नोकरी देणार्या कंपनीची वेबसाईट, कंपनीने केलेला करार, कंपनीने पाठवलेली कायदेशीर नोटीस, तसेच अधिवक्ता हे सर्व खोटे असते. त्यामुळे कुणीही अशा प्रकारे नोकरी देणारे संदेश आले किंवा ई-मेल आले, तर सतर्क राहून अशा प्रकारांना प्रतिसाद देऊ नये !