WB Jalpaiguri Storm : देशातील ४ राज्यांत वादळी पावसाचा तडाखा

बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ

कोलकाता (बंगाल) – ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. बंगाल, आसाम, मिझोराम आणि मणीपूर येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. बंगाल राज्यातील जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण घायाळ झाले. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून शोक व्यक्त केला आहे, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जलपाईगुडी आणि सिलीगुडी या भागांना भेट देऊन पीडितांची चौकशी केली.

१. जलपाईगुडी येथे अनेक घरांची हानी झाली. सिलीगुडीतील बागडोगरा विमानतळाची काही प्रमाणात हानी झाली आहे.

२. मुसळधार पावसामुळे आसाममधील गौहत्ती येथे असलेल्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही मोठी हानी झाली. यामुळे काही वेळ विमान वाहतूक बंद करण्यात आली होती, तर ६ उड्डाणे वळवावी लागली.

३. मिझोराम राज्यात असलेल्या चंफई जिल्ह्यातील लुंगटान गावात चर्चची इमारत कोसळली. आयझॉल जिल्ह्यातील सियालसुक येथे आणखी एका चर्चच्या इमारतीची हानी झाली.

४. मणीपूरच्या थौबल आणि खोंगजोम भागात अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरांच्या कौलांचे छत उडून गेले.

५. बंगालच्या मैनागुरीतील अनेक भागात जोरदार वार्‍यामुळे अनेक घरांची हानी झाली, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब पडले. राज्यातील सर्वाधिक प्रभावित भागात राजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी यांचा समावेश आहे.