एकीकडे तरुण पाश्चात्त्य विकृतीच्या अधीन जात असतांना मैथिली ठाकूर हिच्यासारख्या गायिका एक चांगला आदर्श तरुणांसमोर ठेवत आहेत. ‘जॅझ’, ‘पॉप’, ‘रॅप’ यांसारख्या तामसिक गायनांच्या पद्धतींमुळे व्यक्तीभोवती नकारात्मक वलय निर्माण होते आणि त्याचे मन एकाग्र होण्याऐवजी भरकटून जाते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गाण्यांमध्ये अश्लीलता दाखवणे, गाणे गातांना अश्लील शब्दांचा वापर करणे, असे प्रकार सर्रास होत आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कलाकार ते स्वातंत्र्य घेतात आणि ऐकणारेही त्यात वहावत जातात. त्यामुळे अशा प्रकारांना समाजातून विरोध होतांना दिसत नाही. सूज्ञ लोक ‘सध्या हे असेच चालायचे !’ किंवा ‘आपले कोण ऐकणार आहे ?’, अशी कूपमंडूक वृत्ती घेऊन बसले आहेत; जी सगळ्यात घातक आहे. एखादी चुकीची गोष्ट घडत असतांना चांगल्या माणसांनी गप्प रहाणे, हेही त्या चुकीत सहभागी होण्यासारखेच आहे. काही तरी नवीन करण्याच्या नादात आपण चुकीच्या गोष्टींना तर प्रोत्साहन देत नाही ना ? याचा अभ्यास करायला हवा.
आपल्या सनातन संस्कृतीमधील प्रत्येक कलाकृती ही ‘सत्यम्, शिवम्, सुंदरम् ।’ अशी आहे. आपण प्रत्येक वेळी तिचा अभ्यास आणि तिची साधना केल्यावर ती आपल्याला नवीनच भासते अन् प्रत्येक वेळी आपल्याला नवीन गोष्ट शिकवून जाते. हिंदु धर्मातील ६४ कला आणि १४ विद्या या ईश्वरप्राप्तीसाठीच आहेत. कित्येकदा एखादी व्यक्ती जर भारतीय संस्कृतीचे पालन करत असेल, तर तिला जुनाट विचारसरणीची म्हणून हिणवले जाते. असे असतांना टीकाकारांची तमा न बाळगता आपल्या संस्कृतीसमवेत घट्ट रहाणे आणि आजूबाजूच्या भ्रामक, क्षणिक मायाजाळाला न फसता स्वतःची संगीत साधना चालू ठेवणे यासाठी मैथिली ठाकूर हिचे खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. कलाक्षेत्रामध्ये काम करण्यास उत्सुक असणार्या तरुणांनी मैथिलीचा आदर्श घ्यायला हवा. मैथिली ही शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन गाते. ‘केवळ भजने गायची’, असे तिने ठरवले आहे. पुष्कळ प्रसिद्धी मिळूनही तिने अधिक पैसे आणि प्रसिद्धीसाठी अन्य गीते किंवा चित्रपटगीते अद्याप तरी गायलेली नाहीत. अनुराधा पौडवाल या ज्येष्ठ प्रसिद्ध गायिकेनेही एका टप्प्यावर चित्रपट गीते गाण्याचे सोडून केवळ भजने गाण्याचा निर्णय घेतला आणि तो अद्यापपर्यंत पाळला. जेव्हा त्यांना रामलल्लाच्या (रामाचे बालकरूप) प्राणप्रतिष्ठेच्या वेळी गाण्याची संधी मिळाली, तेव्हा ‘हे याचेच फळ आहे’, असा त्यांचा भाव होता. मैथिली ही युवा गायिका असूनही तिच्यावर आधुनिक संगीताचा विकृत परिणाम झालेला नाही. मैथिलीसारख्या गायकांचा केवळ भक्तीगीते गाण्याचा निर्णय आणि निष्ठा पाहिल्यावर केवळ कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे वचन या निमित्ताने आठवते !
– श्री. जयेश बोरसे, पुणे