श्री तुळजापूर देवस्थानाने मंडप आणि पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय !  

ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

भाविकांना अशा प्रकारे उन्हाचा त्रास सहन करावा लागतो

तुळजापूर – एप्रिल महिना चालू झाला असून उन्हाचा पारा ३८ अंशांपर्यंत पोचला आहे. उन्हाचे चटके भाविकांना मोठ्या प्रमाणात बसत असून श्री तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे श्री तुळजापूर मंदिरात भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गतवर्षी आणलेले लोखंडी खांब ज्यातूनच पुढे मंडप उभारणी करण्यात येणार होती, ते प्रशासकीय इमारतीच्या मागे धूळ खात पडून आहेत. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत असून याकडे ना मंदिर प्रशासनाचे लक्ष आहे ना नगर परिषदेचे !

मंदिर परिसरात गतवर्षी खरेदी केलेले विनावापर पडलेले खांब आणि त्यांचे साहित्य

१. गतवर्षी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मंडप टाकण्यासाठी लोखंडी खांब भाविकांनी दिलेल्या दानातून खरेदी केले होते. यातून गतवर्षी सुवर्णेश्‍वर मंदिरापर्यंत मंडप उभारण्यात आला होता. यंदा १ एप्रिल उजाडला, तरीही हा मंडप उभारण्यात आलेला नाही. यामुळे भाविकांना मंदिर परिसरात उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

२. सकाळी ९ पासूनच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून फरशांना पांढर्‍या रंगाचा कोट मारणे अपेक्षित आहे, तेही करण्यात आलेले नाही. मंदिर परिसरात असणार्‍या दुकानदारांनी त्यांच्यापुरते दर्शनी भागात कापड लावून घेतल्याने तेवढ्यापुरते भाविकांना त्रास अल्प होतो.

३. लवकरच गुढीपाडव्यापासून चैत्र यात्रा चालू होणार असून सहस्रो भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. या भाविकांना उन्हापासून संरक्षण देणारी कोणतीही व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली नाही. शहरातही जागोजागी पाणपोई करणे अपेक्षित असतांना ती नसल्याने भाविकांनी पाणी विकतच घेऊन प्यावे लागत आहे. यात भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होते.

मंदिर परिसरात असणारी अस्वच्छता

४. मंदिर परिसरात स्वच्छतेच्या बाबतीतही दुर्लक्ष होत असून प्रतिदिन मोठ्या प्रमाणात कचरा मंदिर परिसरात साचलेला आढळून येतो.

मंदिर प्रशासनाचे भाविकांच्या सोयींकडे पूर्णपणे दुर्लक्ष ! – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, श्री तुळजाभवानीदेवी पुजारी मंडळ

महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सहस्रो भाविक येतात. या भाविकांना उन्हाच्या त्रासापासून संरक्षण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच अन्य किमान सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने मंदिर प्रशासन आणि नगर परिषद या दोघांचेही भाविकांच्या सोयींकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही त्याची नोंद घेतली जात नाही. विश्‍वस्त आणि प्रशासकीय अधिकारी हे त्यांच्याच विश्‍वात मग्न असून भाविकांच्या त्रासाशी त्यांना काहीएक देणे-घेणे नाही. ऐन उन्हाळ्यात भाविकांची प्रचंड हेळसांड होत असून जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय ! हे थांबवण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !