Patna High Court : जोडीदाराला भूत-पिशाच्च म्हणणे क्रूरतेचे लक्षण नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करतांना टिप्पणी

पाटलीपुत्र (बिहार) – विवाहित जोडप्याने एकमेकाला ‘भूत’ अथवा ‘पिशाच्च’ म्हणत हिणवणे हे ‘क्रौर्य’ नव्हे, अशी टिप्पणी पाटणा उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या वादावरील सुनावणीच्या वेळी नुकतीच केली. झारखंड राज्यातील बोकारोचे रहिवासी सहदेव गुप्ता आणि त्यांचा मुलगा नरेश कुमार गुप्ता यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या खंडपिठाने ही टिप्पणी नोंदवली. नरेश गुप्ता यांच्या घटस्फोटित पत्नीने स्थानिक न्यायालयांत केलेल्या याचिकांवरील आदेशाला गुप्ता पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या प्रकरणी गुप्ता पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेला विरोध करतांना ‘२१ व्या शतकात एका महिलेला सासरच्या मंडळींनी ‘भूत’ आणि ‘पिशाच्च’ म्हणणे हा अत्यंत क्रूर वर्तनाचा प्रकार आहे,’ असा युक्तीवाद घटस्फोटित महिलेच्या अधिवक्त्याने केला होता. ‘हा युक्तीवाद स्वीकारार्ह नाही,’ असे न्यायालयाने नोंदवले. ‘वैवाहिक नात्यामध्ये, विशेषत: अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक नात्यामध्ये पती-पत्नी दोघांनीही एकमेकांशी घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रसंग घडतात. असे असले, तरी हे सर्व आरोप क्रौर्य ठरत नाहीत’, असे मत न्यायालयाने नोंदवले.

संपादकीय भूमिका

मुळात साधनेच्या अभावामुळेच कलियुगातील पती-पत्नी अत्यंत खालच्या थराला जाऊन एकमेकांशी भांडण करतात. अनेक वेळा त्याचे पर्यावसान घटस्फोटात होते. समाजपुरुषाला आनंदी आणि अंतर्मुख करण्यासाठी त्याच्याकडून साधना करून घेणे आवश्यक आहे, हेच अशा प्रसंगांतून लक्षात येते !