विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – विनापरवाना वाहन चालवणार्‍या २ अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धूलिवंदन निमित्त सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी केली होती. त्या वेळी २ अल्पवयीन मुले दुचाकी चालवत होती. त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघांकडेही वाहन चालवण्याचा परवाना नव्हता.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी श्रावण शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारी अन्वये पालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. विनापरवाना वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे. अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन परवाना संमत करू नये, तसेच जप्त केलेला वाहनाचा परवाना एक वर्षासाठी रद्द करावा, असे पत्र प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

वाहन चालवण्याविषयीचे सर्व नियम सर्वजण पाळतात कि नाही ? याविषयी सतत लक्ष ठेवणे आणि न पाळणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. असे सातत्याने केले, तरच जनतेला नियम पाळण्याविषयी वचक बसेल !