स्पष्ट नियमावलीअभावी ऑनलाईन लूट करणार्या खासगी ट्रॅव्हल्सना अभय !
मुंबई, २९ मार्च (वार्ता.) – परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार करूनही या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. प्रवाशांची ‘ऑनलाईन’ लूट करणार्या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्यामध्ये स्पष्ट आदेश नसल्यामुळे स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी तक्रार करूनही सरकारची फसवणूक करणारे खासगी ट्रॅव्हल्सवाले अद्यापही मोकाट आहेत.
परिवहन विभागाची अधिकृतरित्या अनुमती न घेता प्रवाशांची वाहतूक करणार्या खासगी ट्रॅव्हल्सचे ‘ॲप’ आणि ‘संकेतस्थळे’ यांवर कारवाई करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ६ मार्च २०२४ या दिवशी परिवहन आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये सरकारची फसवणूक करणारे ‘ॲप’ आणि संकेतस्थळे यांची नावेही देण्यात आली आहेत; मात्र तक्रारीला महिना व्हायला आला, तरी या प्रकरणी कारवाई झालेली नाही.
‘ॲप्स’ आणि ‘संकेतस्थळे’ यांद्वारे होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र नियमावली लागू करण्यासाठी, त्याविषयी शिफारसी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०२३ मध्ये समिती गठीत केली होती. या समितीने ४ जानेवारी २०२४ या दिवशी राज्याच्या प्रधान सचिवांकडे याविषयीचा अहवाल सादरही केला आहे; मात्र अद्याप सरकारने याविषयीची नियमावली लागू केलेली नाही.
राज्यात नियमावली लागू करण्याची केंद्रशासनाची सूचना !केंद्रशासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वर्ष २०२० मध्ये ‘मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स २०२०’ अन्वये ‘ॲप’ आणि संकेतस्थळ यांद्वारे प्रवासी वाहतूक चालवणार्या व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक नियमावली लागू करण्यात आली आहे. ही नियमावली राज्यातही लागू करण्याचे निर्देश ऑगस्ट २०२२ मध्ये केंद्रशासनाने दिले आहेत; मात्र महाराष्ट्र अद्याप नियमावली लागू न झाल्याने प्रवाशांची ऑनलाईन लूट करणार्यांचे फावले आहे. |