स्वत:च्या बाळाचा जन्म हा आई-वडिलांसाठी आनंदोत्सव असतो. या वर्षी २९ फेब्रुवारी या दिवशी जन्मलेल्या बाळांचा वाढदिवस आता थेट २०२८ या वर्षी येणार असल्याने याचे पालकांना काहीसे वाईट वाटत असल्याचे प्रसारमाध्यमांतून पहायला मिळाले. ख्रिस्ती कालगणनेनुसार वाढदिवस साजरा केल्याने असे होते. हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला सांगितले आहे. यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी ३ वर्षे थांबावे लागत नाही. या ठिकाणी हिंदु धर्मशास्त्र आणि संस्कृती यांची महानता पुन्हा एकदा अधोरेखित होते. हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस तिथीने साजरा केल्यास ही अडचण येणार नाही, तसेच जिवाला आध्यात्मिकदृष्ट्याही लाभ होईल. हिंदु कालगणना परिपूर्ण असल्यामुळे वरील प्रकारची अडचण त्यात येत नाही. यावरून महान भारतीय हिंदु संस्कृतीचे महत्त्वही लक्षात येते.
हिंदु पंचांगानुसार प्रति ३ वर्षांनी येणारा अधिक मास किंवा काही वर्षांनी येणारा ‘क्षय मास’ असतो. ‘या वेळी जन्मलेल्यांचा वाढदिवस साजरा कसा करणार ?’, या प्रश्नाचे उत्तर हिंदु धर्मशास्त्रात दिलेले आहे. अधिक मासात येणारा वाढदिवस हा पुढील वर्षीच्या त्या मासामध्ये त्या तिथीला साजरा करता येतो. क्षयमास म्हणजे एका मासाचा पूर्वार्ध आणि दुसर्या मासाचा उत्तरार्ध. उदाहरणासाठी मार्गशीर्ष आणि पौष मास घेऊया. ‘क्षय मासाच्या कालावधीत पूर्वार्धात जन्म झाल्यास वाढदिवस मार्गशीर्ष मासात आणि उत्तरार्धात जन्म झाल्यास वाढदिवस पौष मासात साजरा करावा’, असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू प्रसंगीही या नियमांनुसारच श्राद्ध करावे. एखाद्या तिथीचा क्षय होणे, म्हणजे प्रत्यक्ष लगेच तिथी संपत नाही. सूर्याेदयाच्या वेळी जी तिथी असते, तो दिवस तिथी म्हणून पकडला जातो. यावरून हिंदु धर्मशास्त्र हे अत्यंत प्रगत आणि परिपूर्ण असल्याचे आपल्या लक्षात येते. आज हिंदूंनी धर्मशास्त्र समजून घेण्याची आवश्यकता आहे.
हिंदु संस्कृती वाढदिवस तिथीने साजरा करण्यास सांगते. पाश्चात्त्यांच्या कालगणनेतील ही उणीवच आहे. हिंदु कालगणना म्हणजेच संस्कृती ही परिपूर्ण आहे. आपल्या पूर्वजांनी या सर्व गोष्टींचा अत्यंत सखोल अभ्यास केला आहे. दूरदृष्टीने यामध्ये येणार्या अडचणी लक्षात घेऊन त्यावरील उपाययोजनाही सांगितली आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानाची हीच वेळ आहे. आपली संस्कृती जोपासनेची एक कृती आपल्याला आध्यात्मिक लाभ तर करून देईलच; पण आपण त्यामुळे आपल्या संस्कृतीशी जोडले जाणार आहोत. हे ध्यानात घेऊन हिंदूंनी आपल्या परिपूर्ण आणि बिनचूक अशा महान कालगणनेचे महत्त्व जाणून तिथीनुसार वाढदिवस साजरा करावा !
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी