‘सेमीकंडक्टर’ उद्योगात भारताचा महासत्ता होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सहभाग

(‘सेमीकंडक्टर’ म्हणजे अर्धसंवाहक. ‘सेमीकंडक्टर’ हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आणि उपकरणे यांमधील महत्त्वाची सामुग्री)

भारताने ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीला सर्वाधिक प्राधान्य दिले असतांनाच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘सेमीकंडक्टर’च्या ३ प्रकल्पांना संमती देण्यात आली. या प्रकल्पांची किंमत १ लाख २६ सहस्र कोटी रुपये आहे. सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील ‘टाटा ग्रुप’कडून एक प्रकल्प ढोलेरा (गुजरात), दुसरा प्रकल्प मोरीगाव (आसाम) आणि ‘सीजी पॉवर’कडून साणंद (गुजरात) येथे बांधला जाणार आहे. १०० दिवसांच्या आत हा प्रकल्प चालू होणार आहे. या प्रकल्पात ९१ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याने २० सहस्र लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

१. ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्पाची व्याप्ती आणि उत्पादन क्षमता

ढोलेरा, गुजरातमधील ‘टाटा इलेक्ट्रॉनिक’ प्रकल्प ‘पॉवर चीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग कॉर्पोरेशन, तैवान’ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू होणार आहे. प्रस्तावित प्रकल्प चांगल्या गुणवत्तेच्या ‘२८ एन्.एम्. चीप’ची निर्मिती करणार आहेत. प्रतिमास ५ सहस्र ‘वेफर’ (सेमीकंडक्टरचा पातळ तुकडा) क्षमतेची ही प्रकल्प निर्मिती आहे. यावर प्रतििक्रया देतांना केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘‘एका ‘वेफर’मध्ये ५ सहस्र चीपची क्षमता असते. यानुसार एका वर्षात हा प्रकल्प ३ दशलक्ष चीपची निर्मिती करणार आहे. या चीपच्या निर्मितीचा वापर संरक्षण, ऑटोमोटिव्ह, ‘टेलिकॉम’ (दूरभाष क्षेत्र) या क्षेत्रासाठी केला जातो.’’ ‘डेव्हलपमेंट ऑफ सेमीकंडक्टर’ आणि ‘डिस्प्ले मॅन्युफॅक्चरींग इकोसिस्टीम’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत या चीपची निर्मिती देशात केली जाईल. या कार्यक्रमासाठी सरकारकडून ७६ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य केले जाऊन त्यातील ५९ सहस्र कोटी रुपये या ३ प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. यातील टाटा कंपनी प्रकल्पात प्रतिमास ५० सहस्र ‘वेफर’ निर्मिती होणार आहे. याखेरीज ‘टाटा सेमीकंडक्टर ॲसेंब्ली अँड टेस्टटे प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याद्वारे मोरीगाव, आसाम येथे २७ सहस्र कोटी रुपयांचा प्रकल्प चालू केला जाणार आहे. तिसर्‍या प्रकल्पात ४८ दशलक्ष ‘वेफर’ची निर्मिती केली जाणार असून यामध्ये ‘इव्ही’ (इलेक्ट्रॉनिक गाड्या), कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, स्मार्टफोन या उत्पादनांसाठी निर्मिती केली जाईल. ‘सीजी पॉवर प्रकल्प’, हा ‘रेनीसास इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन’, ‘स्टार मायक्रो इलेक्ट्रॉनिक, थायलंड’ यांच्या साहाय्याने साणंद, गुजरात येथे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत ७ सहस्र ५०० कोटी रुपये असेल.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. भारतीय ‘सेमीकंडक्टर’ची मागणी ११० अब्ज (९ लाख ३५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) डॉलर

मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूचे ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या) नेतृत्वाखालील ‘डिजिटायझेशन’मुळे ‘सेमीकंडक्टर’ हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. वर्ष २०३० पर्यंत जागतिक ‘सेमीकंडक्टर’ उद्योग १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याची आणि भारतीय ‘सेमीकंडक्टर’ची मागणी ११० अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. ‘सेमीकंडक्टर’ उत्पादनात भारताचा प्रवेश लक्षणीयरित्या जागतिक पुरवठा साखळीत आणि जागतिक ‘सेमीकंडक्टर’ उद्योगात भारताला एक महत्त्वाचा खेळाडू बनवेल. जूनच्या अखेरीस मंत्रीमंडळाने ‘मायक्रोन’ या सुरतमधील ‘सेमीकंडक्टर’ निर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली होती. भारताला ‘सेमीकंडक्टर ग्लोबल हाऊस’ (जागतिक उत्पादन केंद्र) बनवण्यासाठी सरकारकडून त्याच्या गुंतवणूकीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न चालू आहेत.

३. ‘सेमीकंडक्टर’ची आयात आणि चीनवरील अवलंबित्व न्यून करण्यासाठी

‘फॉक्सकॉन’ने ‘वेदांता ’सोबतचा भागीदारी प्रकल्प रहित केल्याची घोषणा वर्ष २०२३ मध्ये करताच केंद्र सरकारच्या ‘सेमीकंडक्टर’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हा उद्योग अत्यंत स्पर्धात्मक असून तो यशस्वी होण्यासाठी आस्थापनांना नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘जागतिक सेमीकंडक्टर बाजारा’ला चिप्सची कमतरता, तसेच वाढत्या खर्चासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारताचे ‘सेमीकंडक्टर’ धोरण हा एक व्यापक कार्यक्रम आहे. डिसेंबर २०२१ मध्ये धोरण घोषित करण्यात आले होते, ज्याचा उद्देश ‘भारताला ‘सेमीकंडक्टर डिझाईन’, उत्पादन आणि चाचणीसाठी जागतिक केंद्र बनवणे’, हा आहे.

या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच ज्या आस्थापनांना देशात ‘सेमीकंडक्टर’ आस्थापनाची स्थापना करायची आहे त्यांना प्रोत्साहन देणे, याचाही यात समावेश आहे. देशातच चाचणी सुविधा उभारणार्‍या आस्थापनांना बळ देऊन चाचणी क्षमता विकसित करणे; प्रशिक्षण देऊन या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उभे करणे, हाही या धोरणाचा एक भाग आहे. अनेक आस्थापनांनी भारतात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. भांडवली अनुदान, कर सूट, तसेच संशोधन आणि विकास यांसाठी निधी देण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. ‘सेमीकंडक्टर इकोसिस्टम’ विकासासाठी समर्थन देतांना चाचणी सुविधांच्या विकासासाठी, कुशल कामगारांची निर्मिती आणि संशोधन विकासाला चालना दिली जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. हे धोरण यशस्वी झाले, तर भारत जागतिक उत्पादन केंद्र बनवेल आणि या क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण करील.

‘सेमीकंडक्टर’ आयात आणि चीनवरील अवलंबित्व न्यून करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. म्हणूनच भारतात ‘सेमीकंडक्टर’च्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासह पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढेल, याची काळजी सरकार घेत आहे. हे धोरण यशस्वीपणे राबवल्यानंतर देशामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. ‘सेमीकंडक्टर’ बाजारपेठ ही जागतिक स्तराची असून यात उपकरणांची रचना, उत्पादन आणि विक्री यांचा समावेश होतो. संगणक, स्मार्टफोन, ऑटोमोबाईल्स, तसेच औद्योगिक उपकरणांमध्ये यांचा वापर होतो. वर्ष २०२४ ते २०२९ पर्यंत जागतिक ‘सेमीकंडक्टर’ बाजारपेठ वर्षिक १२.२ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढेल.

४. ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्रात भारत महासत्ता होणार ?

‘सेमीकंडक्टर चिप’ उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल. सध्याचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याची कल्पना ‘सेमीकंडक्टर’विना करता येत नाही. त्यातून भारताला आधुनिकतेकडे नेण्याची क्षमता निर्माण होईल. भारत आता ४ थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने २ वर्षांपूर्वी ‘सेमीकंडक्टर’ मोहिम चालू करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेगवान कार्यवाही करून आज ‘सेमीकंडक्टर’चे उत्पादन चालू होत आहे आणि त्याची निर्मिती करणार्‍या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. भारत प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत स्वतःच्या उपस्थितीसाठी सर्वांगीण कार्य करत आहे. भारत अणु आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये महाशक्ती आहे. आता लवकरच ‘सेमीकंडक्टर’चे व्यावसायिक उत्पादन केले जाईल आणि येत्या काही दिवसांत भारत या क्षेत्रातही महासत्ता बनेल.

या क्षेत्रात ‘इंटेल’, ‘सॅमसंग’ आणि ‘टी.एस्.एम्.सी.’ यांसारखी आस्थापने नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन अन् विकास यांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. चिप्सची कमतरता, वाढती किंमत आणि त्यांची वाढती जटीलता या आव्हानांचा या क्षेत्राला सामना करावा लागत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, ‘५ जी’ तंत्रज्ञान आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (जी संगणकीय उपकरणे, यांत्रिक, तसेच डिजिटल यंत्रे, वस्तू, प्राणी किंवा लोकांची या सर्वांशी संबंधित एक प्रणाली आहे.) यांसारख्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे या बाजारपेठेची मागणी वाढतच आहे. हे लक्षात घेऊनच सरकार ‘सेमीकंडक्टर’च्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून भारताची ओळख ‘सेमीकंडक्टर’ची ‘जागतिक बाजारपेठ’ अशी होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’ आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.