उजनी धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा !

उजनी धरण

सोलापूर – उजनी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन, जलाशयातून शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी ८ दिवसाला अंदाजे १ ‘टी.एम्.सी.’ पाणी संपत आहे. १५ मेच्या दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून ६ ते साडेसहा ‘टी.एम्.सी.’ पाणी सोडावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला असून उर्वरित तालुक्यांमध्येही चिंताजनक स्थिती आहे.

सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरो आणि पिंपळगाव ढाळे या ७ मध्यम प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत दीड ‘टी.एम्.सी.’ पेक्षाही अल्प पाणी आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या २८ टँकर चालू आहेत. अजूनही दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे; पण निकषांच्या साखळदंडात त्यासाठी विलंब होत असल्याची वस्तूस्थिती आहे. पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी अडीच ‘टी.एम्.सी.’ पाणी सोडावे लागेल आणि त्याच वेळी सोलापूर शहरासाठी आणखी १ अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल. त्या वेळी धरणातील मृतसाठा उणे ७० टक्क्यांपेक्षा खाली जाऊ शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे.