मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक !

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात मार्च अखेरीस मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील १०० लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून २६९ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. धरणातील पाणीसाठा घटल्याने सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. शहरी भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यांत पाणीटंचाई वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत टँकरच्या फेर्‍या सर्वांत अधिक आहेत. विभागातील मोठ्या ११ धरणांत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत १३.३९ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत १३.७१ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधार्‍यांत २७.९९ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधार्‍यांत १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या साहायक मुख्य अभियंता यांनी दिली आहे.

वैजापूर

उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने सुमारे १० कोटी ७२ लाख रुपयांचा कृती आराखडा सिद्ध केला असून या आराखड्यास संमती मिळाली आहे. सध्या वैजापूर तालुक्यात २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आणखी ७ गावांनी टँकरची मागणी केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे किरण पोपळघट यांनी दिली.

सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात २५ गावांत ५७ टँकरने पाणीपुरवठा चालू असून ६ विहिरींचे अधिग्रहण ग्रहण करण्यात आले आहे. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा न्यून झाला आहे. अशीच परिस्थिती पुढे राहिली, तर सिल्लोड तालुक्यात येणार्‍या काळात मोठी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृतीसह ठोस उपाय काढणे आवश्यक !