अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे कोल्हापूरच्या ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे चित्तथरारक सादरीकरण !

राम उत्सवात मर्दानी खेळांचे सादरीकरण झाल्यावर मंचावर उपस्थित ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे विविध खेळाडू, तसेच मान्यवर

अयोध्या – भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून अयोध्या येथे उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने श्रीराम उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतातील सर्व राज्यांतील नामवंत प्रसिद्ध संस्कृतीचे लोककलेचे सादरीकरण करण्यात येत आहे. या उत्सवामध्ये कोल्हापूरमधून ‘श्रीजा फाऊंडेशन’ या संस्कृतीसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेच्या माध्यमातून मर्दानी खेळ संस्था ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या सादरीकरणात मंचच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली जोतिबा डोंगर येथील महिला खेळाडूंचा सहभाग होता. सदरच्या खेळाडूंनी चित्तथरारक सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली.

राम उत्सवात डोक्यावरील श्रीफळ फोडण्याचे प्रात्यक्षिक दाखवतांना ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे खेळाडू

यात खेळाडूंनी भाला फिरवणे, दांडपट्टा फिरवणे, नारळ फोडणे यांसह अन्य मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. या सर्वांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन समिती, ‘श्रीजा फाऊंडेशन’चे श्री. चंद्रकांत पाटील, ‘हिल रायडर्स’चे श्री. प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.