मनुष्‍यजीवन आणि अध्‍यात्‍म !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. मृत्‍यू जवळ आल्‍यावर एखादा महापुरुषच मंत्रमय शब्‍द उच्‍चारू शकणे !

‘मृत्‍यू म्‍हणजे विनाश नव्‍हे, मृत्‍यू हा विश्राम आहे. विश्रांती आहे. भगवंताचे वरदान आहे. ‘मृत्‍यू जवळ आला आहे’, हे जाणल्‍यावर शरिराची सर्व क्षीणता भोगत असतांना, सर्व वेदना शरिराला त्रास देत असतांना, शास्‍त्रीबुवांसारखाच पूर्ण अद्वैतात स्‍थिर झालेला, क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद जाणणारा महापुरुषच मंत्रमय शब्‍द आपल्‍या मुखातून प्रसन्‍नतेने बाहेर काढू शकतो.

२. द्वंद्वाविना जीवनच अशक्‍य ! 

क्रिया आणि प्रतिक्रिया हा प्रकृतीचा शाश्‍वत नियम आहे. एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. कोणतीही एकच बाजू स्‍वीकारता येत नाही. सुख हवे असेल, तर दुःख पत्‍करावेच लागेल. दुसरी बाजू कुठे जाईल ? व्‍यक्‍त जीवन आहे तेथे दोन विरोधी, परस्‍परविरोधी शक्‍ती आहेतच. द्वंद्वाविना जीवनच अशक्‍य आहे. प्रकृतीचा हा शाश्‍वत नियम समजून घ्‍यायला हवा. नियमाचे अतिक्रमण शक्‍य नाही; कारण द्वंद्वाच्‍या नियमानेच प्रकृतीचे कार्य चालते. सृष्‍टीचे कार्य जे चालते, तेथे द्वंद्व आहे म्‍हणूनच ! द्वंद्व मावळणे म्‍हणजे सृष्‍टीचा प्रलय ! गती संपणे, म्‍हणजेच द्वंद्व संपणे.

३. प्रकृतीचा खेळ आणि जिवाची होणारी जडणघडण !

जिवाने साक्षी होऊन प्रकृतीचा खेळ बघावा. लक्षात ठेवावे की, तृणापासून ते ब्रह्मांडापर्यंत जिथे गती आहे, तिथे द्वंद्व आहेच. सुख-दुःख हे एकट्या जिवाचे नाही, तर सर्व चराचराचे आहे. म्‍हणून प्रत्‍येक परिस्‍थिती, घटना, प्रसंग, गोष्‍टीचे लाभ असतात, तसे तोटेही असतात. संपूर्ण लाभच लाभ शक्‍य नाही, तसेच संपूर्ण हानीही असू शकत नाही. हे जर पक्‍के जाणले, तर तीव्र दुःखाच्‍या वेळीही त्‍या दुःखाची अपूर्ण बाजू, त्‍यात लपलेले भविष्‍यातील कल्‍याणाचे बीज साधकाच्‍या लक्षात येते. या उलट आत्‍यंतिक सुखाच्‍या वेळी त्‍या सुखाची अनित्‍यता, भंगुरता आणि त्‍यानंतर येणार्‍या दुःखाची चाहूल तो ओळखू शकतो. यातूनच हळूहळू तो शांत चित्त होऊन रस्‍त्‍यावर प्रतिष्‍ठित होतो. इंद्रिये आणि विषय यांतील पूल तुटत जातो. ऐषोआराम आणि शरिराचे प्रचंड कष्‍ट यांतील भेद जाणवेनासा होतो आणि गुरुदेवांसारखे मुमुक्षू साधक तितिक्षेच्‍या रस्‍त्‍याने परमेश्‍वराच्‍या वाटेवर भराभर पावले उचलू लागतात.

४. तितिक्षा आणि शंकासमाधान ! 

आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्‍याच्‍या शंकेचे योग्‍य समाधान केले. तो दुसर्‍या दिवशी परत आला. त्‍याने पुन्‍हा तीच शंका विचारली. आचार्यांनी या वेळी मात्र अधिक विवरण करून त्‍यांच्‍या शंकेचे उत्तर दिले. तिसर्‍या दिवशी तो गृहस्‍थ परत आला. ‘मी विसरलो’, असे म्‍हणून परत तीच शंका विचारली. आचार्यांनी पुन्‍हा समजावून सांगितले. असे क्रमाने ८ दिवस झाल्‍यावर मात्र आचार्यांचे शिष्‍य त्‍याला बाहेरूनच घालवून देणार, इतक्‍यात आचार्यांनी त्‍याला बोलावले. पुन्‍हा तेच शंका-समाधान झाले. हा क्रम चालूच राहिला. शिष्‍य प्रतिदिन हसायचे. चिडवायचे. तरीही तो येतच राहिला. शेवटी ३० व्‍या दिवशी मात्र तो गृहस्‍थ आला नाही. आचार्य शिष्‍यांसहित त्‍याच्‍या घराच्‍या दाराशी गेले आणि विचारले, ‘‘आज आला नाहीत ?’’ आतून शांत आवाजात उत्तर आले, ‘गुरुदेव, आपल्‍या कृपेने आज मला ते समजले, हवे ते प्राप्‍त झाले.’’ धन्‍य तो तितिक्षावान शिष्‍य आणि धन्‍य ते आद्यशंकराचार्य अन् धन्‍य ती गुरुशिष्‍य परंपरा !’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१९)