माझ्या एका नातेवाईकाने त्याच्या वाढदिवसाचे एक छायाचित्र दुसर्या नातेवाईकाला पाठवले होते. दुसर्या नातेवाईकाने मला ते दाखवले. त्यामध्ये पहिल्या नातेवाईकाच्या चेहर्यावर त्याच्या मित्रांनी केक लावलेला दिसत होता आणि त्याच्या चेहर्यावर केकचे मोठे तुकडे दिसत होते. ते पाहून मी म्हटले, ‘‘अशा रितीने अन्नाचा दुरुपयोग करणे चुकीचे आहे. आपण कळवायला हवे.’’ त्यावर दुसर्या नातेवाईकाने सांगितले, ‘‘आजकाल असेच असते.’’ यावरून आजकाल वाढदिवस साजरा करतांना अशा रितीने केक तोंडाला फासण्याचे प्रकार होतात, असे वाटते. खरेतर असे करणे चुकीचे आहे; कारण मूलतः निसर्गाने जी वस्तू ज्या गोष्टीसाठी दिली आहे, त्यासाठीच तिचा वापर करणे योग्य आहे. काही धार्मिक विधींमधील अन्नाचा वापर वगळल्यास अन्न हे विशेषत्वाने ग्रहण करण्यासाठी आणि पोषणासाठी आहे. ते अशा रितीने वाया जाणे, हे चुकीचे आहे. कुणाला वाटेल की, ‘आपण पैसे देऊन खरेदी करतो. मग त्याचे आपण काही केले तरी काय मोठे ?’, हा दृष्टीकोन चुकीचा आहे. पैसे ही मानवाने निर्माण केलेली कृत्रिम व्यवस्था आहे. व्यवहारासाठी ती आपण वापरतो आणि वस्तू खरेदी करतो. शेतकरी श्रमाने अन्न पिकवतो ते कुणाच्या तरी मुखात जाण्यासाठी ! असे असले, तरी तोसुद्धा ते बीज सिद्ध करत नसतो. मूलत: ते बीज आणि भूमी, पाणी आदी धान्य पिकवण्यासाठीचे आवश्यक घटक निसर्गच देतो. मग असे असतांना जी वस्तू माणूस निर्माणच करू शकत नाही, तिचे मूल्य आपण ठरवू शकतो का ? यासह युवा पिढीने हेही लक्षात घ्यायला हवे की, काही दशकांपूर्वी भारताची अन्नसाठा स्थिती अशी होती की, मुंबई बंदरात गहू घेऊन जहाज आल्यावर रेशनला गहू मिळत असे. (व्यक्तीश: मी स्वत: रेशनला गहू आला का ? हे आधी खात्री करण्यासाठी गेलो आहे आणि ज्या दिवशी गहू आल्याचे दिसेल, त्यानंतर मग रेशनच्या रांगेत उभा राहिलो आहे.) भारताच्या तत्कालीन पंतप्रधान त्या काळी ‘सवलतीने आम्हाला गहू द्या’, असे अमेरिकेला सांगायला गेल्या, तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने त्या दिवशी मथळ्याचा आशय केला होता, ‘भिकेचा कटोरा घेऊन आलेल्या पंतप्रधान !’ (२६.३.२०२४)
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.