Tajmahal Shiva Temple : ताजमहाल हे शहाजहानच्या आधीपासून अस्तित्वात असून ते तेजोमहालय आहे !

‘योगेश्‍वर श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट’चा न्यायालयात दावा

ताजमहाल

आगरा – ‘योगेश्‍वर श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट’ने आगरा दिवाणी न्यायालयात ‘ताजमहाल हे तेजोलिंग महादेवाचे मंदिर आहे’, असा दावा प्रविष्ट (दाखल) केला आहे. फिर्यादी पक्षाचे अधिवक्ता अजय प्रताप सिंह यांनी यांनी बाबरनामा, हुमायुनामा, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, ‘बुलेटिन ऑफ ए.एस्.आय., एपिग्राफिका इंडिका, विश्‍वकर्मा प्रकाश, पुराण इत्यादी ग्रंथांचा संदर्भ देत ताजमहाल हे महादेवाचे मंदिर म्हणजे तेजोमहालय असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१. ‘एपिग्राफिका इंडिका’मधील बटेश्‍वर शिलालेखानुसार राजा परमल देव यांनी वर्ष ११९४ मध्ये तुरटीसारखा पांढरा शुभ्र दगड वापरून शिवाचे मंदिर बांधले होते. त्याचे मूळ नाव चारबाग आहे. या बांधकामाचे वर्णन बाबराने त्याच्या ‘बाबरनामा’ या पुस्तकात केले आहे.

२. आगरा गॅझेटियर, ए.एस्.आय. बुलेटिन आणि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल यांच्या अहवालानुसार ताजमहाल ही वास्तू कुणी उभारली, याविषयी वाद आहे. पुरातत्व खात्याने वर्ष १९४६ मध्ये विभागाचे महासंचालक मधोस्वरूप वत्स यांचा ‘ताजमहालची दुरुस्ती’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात ‘ताजमहालचे शिल्पकार कोण आहे ?’, हा वादग्रस्त भाग आहे, असे लिहिले होते.

३.‘ईस्ट इंडिया कंपनी’चे कर्मचारी पीटर मुंडी यांनी वर्ष १६३२ मध्ये ताजगंजच्या बाजारपेठेचा उल्लेख केला आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या अहवालात, ‘ताजमहालच्या आत एक काळ्या रंगाचा बेसाल्ट स्तंभ सापडला, ज्यावर एक कासव कोरलेले होते. ते जैन धर्मातील तीर्थंकर मुनीश्‍वरनाथ यांचे प्रतीक आहे’, असे म्हटले होते. ताजमहाल हे मुमताज महल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहाजहान याने बांधल्याचे म्हटले जाते; मात्र आग्रा गॅझेटियर आणि बुरहानपूर गॅझेटियर यांमध्ये मुमताज महल हिच्या मृत्यूच्या वर्षात भेद आढळून येतो.

४.अधिवक्ता अजय प्रताप सिंह म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचे विश्‍लेषण केल्यानंतर हे सिद्ध होते की, ताजमहालचे अस्तित्व शाहजहानच्या आधीपासून होते. मुळात हे तेजोलिंग महादेवाचे मंदिर आहे, ज्याला तेजो महालय असे म्हणतात.

५. या खटल्यात भगवान श्री तेजोमहादेव, योगेश्‍वर श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट, क्षत्रिय शक्तिपीठ विकास ट्रस्ट आणि अधिवक्ता अजय प्रताप सिंह हे वादी आहेत. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, ‘ए.एस्.आय.’चे महासंचालक, ‘ए.एस्.आय.’ आग्रा सर्कलचे पुरातत्वशास्त्रज्ञ, उत्तरप्रदेश पर्यटन खात्याचे महासंचालक हे प्रतिवादी आहेत.

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची धार्मिक स्थळे पाडून तेथे इस्लामी वास्तू बांधल्या, हे सत्य आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन भारतभरातील अशा इस्लामी वास्तूंचे सर्वेक्षण करून ती हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक !