मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात विविध राजकीय पक्षांकडून सायंकाळी उशिरापर्यंत १६० जणांनी अर्ज केले. यामध्ये रामटेक मतदारसंघातून ४१, नागपूर ५७, भंडारा-गोंदिया ९, गडचिरोली १३ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ४० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही नागपूर मतदारसंघातून २७ मार्च या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्याचा २७ मार्च हा शेवटचा दिवस होता. २८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.