पुणे महापालिकेकडे २ सहस्र १३९ कोटी रुपये मिळकतकर जमा !

मिळकतकर वसुलीसाठी कडक उपाययोजनांची कार्यवाही 

पुणे – आर्थिक वर्षाच्या शेवटच्या सप्ताहांमध्ये थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिकेकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यामध्ये थकबाकीदारांना नोटीस पाठवणे, त्यांच्या घरासमोर वाजंत्री वाजवणे, मिळकती जप्त करणे आणि जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून २५ मार्च या दिवसाअखेर महापालिकेकडे २ सहस्र १३८ कोटी ६५ लाख रुपयांहून अधिक मिळकतकर जमा झाला आहे. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतीच्या संदर्भात कोणतीही ‘अभय योजना’ नाही. वर्ष २०१९ नंतरच्या सर्व मिळकतींना ३० टक्के सवलत दिलेली आहे. असे असतांनाही यंदा अधिक मिळकतकर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. गेल्या वर्षी २५ मार्चपर्यंत १ सहस्र ८३५ कोटी १४ लाख ९० सहस्र ६२५ रुपये मिळकतर जमा झाला होता. त्या तुलनेत चालू वर्षी ३९३ कोटी रुपये अधिक जमा झाले आहेत.

उद्दिष्टांसाठी २६२ कोटी रुपये अल्प !

अंदाजपत्रकांमध्ये मिळकतकराद्वारे २ सहस्र ४०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २६२ कोटी रुपये अल्प पडत आहेत. ही रक्कम गोळा करणे महापालिकेसमोर मोठे आव्हानच आहे.

घरासमोर बँड (वाजंत्री) वाजवल्याने ६० कोटी रुपये जमा !

थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवणे, ही मोहीम चालू आहे. त्याकरता परिमंडळनिहाय पथके सिद्ध करण्यात आली आहे. घरासमोर बँड वाजवल्याने लाजेखातर नागरिक पैसे जमा करतात, असा अनुभव येतो. या माध्यमातून महापालिकेला ६० कोटी रुपये मिळकतकर जमा झाला आहे.