घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना साहाय्य केल्याने पारितोषिक मिळाले ! – आदित्य ठाकरे, ठाकरे गट

इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाल्याचे प्रकरण

डावीकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, इनसेटमध्ये इकबालसिंह चहल

मुंबई – मी केलेल्या भाकिताप्रमाणेच घडत आहे. मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना साहाय्य करण्यासाठी भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी साहाय्य केल्याविषयी मिळालेले हे पारितोषिक आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून केली.

मुंबई महापालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली, तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून स्थानांतर करण्यात आलेले पी. वेलरासू यांची मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.