Indraprastha Search : पांडवांची राजधानी ‘इंद्रप्रस्थ’ शोधण्यासाठी पुन्हा होणार उत्खनन !

पुराण किल्ला

नवी देहली – भारताची राजधानी देहली ही पांडवांची मूळ राजधानी ‘इंद्रप्रस्थ’ असल्याचे म्हटले जाते. याचे पुरावे गोळा करण्यासाठी गेल्या ६० ते ७० वर्षांत वेगवेगळ्या वेळी उत्खनन करण्यात आले आहे. आता सहाव्यांदा उत्खननाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. इंद्रप्रस्थ शोधण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. राजधानीतील पुराण किल्ला येथे हे उत्खनन पुढील महिन्यापासून चालू होऊ शकते. हा पांडवांचा किल्ला मानला जातो.

याआधी ५ वेळा झालेल्या उत्खननात भगवान विष्णु, गणेश आणि लक्ष्मी यांच्या मूर्तींसह मौर्य काळातील विविध कालखंडातील अवशेष सापडले होते. हे अवशेष अनुमाने २ सहस्र ५०० वर्षे जुने आहेत. भारत सरकारच्या सूचनेनंतर या वेळी उत्खननात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पुरातत्व विभाग अत्याधुनिक प्रणालीच्या अंतर्गत ‘लिडर’ सर्वेक्षणाचे नियोजन करत आहे. याद्वारे भूमीखाली गाडलेले अवशेष शोधले जातात. याचे दायित्व वरिष्ठ अधिकारी वसंत स्वर्णकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी स्वत: पुराण किल्ल्याचे तीनदा उत्खनन केले आहे.

केव्हा-केव्हा केले गेले सर्वेक्षण ?

१९५४-५५ मध्ये पुरातत्व विभागाचे माजी महासंचालक प्रा. बी.बी. लाल यांच्या देखरेखीखाली सर्वप्रथम उत्खनन झाले. १९६९-१९७३ मध्ये दुसर्‍यांदा उत्खनन झाल्यानंतर तब्बल ४१ वर्षांनंतर २०१३-१४ मध्ये उत्खनन करण्यात आले. यानंतर वर्ष २०१७-२०१८ आणि शेवटी वर्ष २०२२-२३ मध्ये उत्खनन झाले.

काय-काय सापडले उत्खननात ?

आतापर्यंत येथे झालेल्या उत्खननात टेराकोटाची खेळणी आणि तपकिरी रंगाच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. ही भांडी ख्रिस्तपूर्व १००० वर्षांपूर्वीची आहेत. महाभारताशी संबंधित अनेक ठिकाणी असे पुरावे असलेली भांडी सापडली आहेत. त्यांचा काळ ख्रिस्तपूर्व १००० असा निश्‍चित करण्यात आला होता. असे असले, तरी आतापर्यंत झालेल्या उत्खननात कोणतीही नगररचना सापडली नाही. वर्ष २०२३ मध्ये केलेल्या उत्खननात मौर्य काळ, शुंग काळ, कुशाण काळ, गुप्त काळ, राजपूत काळ, सुलतान काळ आणि नंतर मोगल काळातील अवशेष सापडले.

वर्ष १९५५ मध्ये जुन्या किल्ल्याच्या दक्षिण-पूर्व भागात झालेल्या उत्खननाच्या वेळी महाभारत काळातील वस्तूंशी जुळणारे मातीचे तुकडे सापडले. तथापि पुरातत्व विभाग अजूनही मजबूत पुरावा शोधत आहे.