आपण कधीकधी आनंदी का राहू शकत नाही ? याचा विचार आपण आत्मपरीक्षण करून स्वतः केला पाहिजे. आपल्या सध्याच्या स्थितीला आपणच उत्तरदायी असतो, हे आपण लक्षात घेत नाही. कधी कधी अतीमहत्त्वाकांक्षेमुळे आणि ती पूर्ण न झाल्यामुळे आपण मनात सतत विचार करत बसतो. ‘आपल्या जीवनाचे आपणच स्वतः शिल्पकार आहोत’, हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्या त्या माणसाच्या सवयींवरही दुःख किंवा आनंद वाटणे, हे अवलंबून असते. आपण निष्काळजीपणामुळे स्वतःची प्रकृती बिघडवतो आणि मग आजारी पडून आपल्या आनंदावर विरजण पडते. ‘आपण आपल्यासाठी जगत नसून दुसर्यांसाठीही जगत आहोत’, असा मनात विचार आला पाहिजे. आपल्या वागण्यामुळे दुसर्याला आनंद कसा होईल ? हे जर लक्षात घेतले, तर दुसर्याला वाटणार्या आनंदामुळे आपल्याला होणारा आनंद हा खरा आनंद असतो, हे लक्षात येईल. आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे ? याचे भान ठेवून मग स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी बेभान होऊन झटणे यातील आनंद वेगळाच आहे. ‘आपण बोलतांना दुसर्याला दुखवता कामा नये. दुसर्याची निंदा वा हेटाळणी करता कामा नये; पण एवढी साधी गोष्टही कित्येक जण करत नाहीत. घरातील मा णसेही जेव्हा एकमेकांना समजून घेऊन सहकार्याने वागतात, तेव्हाच घराला घरपण येते. अशा घरात लक्ष्मी, सरस्वती आणि समृद्धी नांदत असतात. काही लोक सतत आळशी राहून आयुष्याचा वेळ दडवतात आणि मग आनंदाला मुकतात. ‘गंजण्यापेक्षा झिजणे अधिक चांगले’, हे ते विसरतात.
– डॉ. प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर