सजग नागरिक मंचाची मागणी
पुणे – आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे महावितरणचे सर्व कर्मचारी थकबाकी वसुली मोहीम राबवत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. ‘वीज कायदा २००५’मधील कलम ५६ प्रमाणे कुणाचीही वीजजोड १५ दिवसांची नोटीस दिल्याविना तोडता येत नाही. त्यामुळे ‘महावितरणने सरसकट वीजजोड तोडण्याची कारवाई करतांना या नियमाचे पालन करावे’, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे; मात्र हे प्रावधान धाब्यावर बसवून परीक्षांच्या दिवसांत ग्राहकांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करायला विरोध नाही; परंतु हे करतांना कायद्याचे पालन करणेही आवश्यक आहे, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.