पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित करणार ! – पिंपरी महापालिकेची चेतावणी

पिंपरी  (जिल्हा पुणे) – उन्हाळा चालू झाला असल्याने सध्या पाण्याची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पाऊस पडण्याची शाश्वती नसल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. वाहन, रस्ते, घर, गृहनिर्माण संस्था परिसर धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर केल्यास प्राथमिक टप्प्यात नोटीस देऊन अवगत करण्यात येईल. त्यानंतरही पाण्याचा अपव्यय न टाळल्यास नळजोडणी खंडित करू, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे. शहराला मावळ परिसरातील पवना आणि आंद्रा धरण, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून पाणी दिले जाते; मात्र पावसाळा विलंबाने चालू झाल्यास पाण्याची टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी टाकून न देता ते उपयोगात आणावे. पिण्याचे पाणी वाहन धुणे, बागकाम, घर, इमारत परिसर स्वच्छ करणे यांसाठी वापरू नये. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांमध्ये स्वच्छतागृह, उद्योग परिसर स्वच्छतेसाठी वापरावे. स्वच्छतेसाठी अल्प पाण्याचा वापर करावा. पाण्याची बचत करावी, जेणेकरून पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. मावळ परिसरातील पवना धरणातून शहराला मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये ४९.६७ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढाच आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी सांगितले.