मुंबई – मॅनहोल, भूमीगत गटारे, जलवाहिन्या, ‘सेप्टीक’ टाकी, ‘सिवेज’ टाकी यांतील मैला उचलण्याचे काम करतांना काही जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे यापुढे हे धोकादायक काम यंत्रमानवाद्वारे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्यात ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे.
हाताने मैला उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचार्यांच्या नियुक्तीला प्रतिबंध करण्याचा केंद्रशासनाचा आदेश, तसेच सर्वाेच्च न्यायालयाची ही कुप्रथा बंद करण्याचा आदेश यांवर महाराष्ट्र शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यापुढे भूमीगत गटारे, मल जलवाहिन्या, मलकुंड टाकी, सार्वजनिक शौचालये यांच्या स्वच्छतेसाठी यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांना प्रत्येकी १ वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.